गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. तिच्या कार्यक्रमांना तरुणांची अलोट गर्दी जमते, हे आता ठरलेले गणित आहे. एवढेच नाही तर गौतमीला पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड थेट स्टेजवरच गोंधळ घालताना दिसते. गौतमी पाटीलने एका कार्यक्रमात अश्लील नृत्य केले होते. त्यावरून तिला मेघा घाडगे आणि सुरेखा पुणेकर यांनी चांगलेच धारेवर धरले होते. लावणीच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या गौतमीला त्यांनी जाहीरपणे माफी लावायला लावली होती. त्यावेळी मी अशी चूक पुन्हा करणार नाही हे तिने कबुल केले होते.
गौतमी पाटील त्यानंतर आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात आली. काही जणांनी तिला लावणी सम्राज्ञी अशी पदवी देखील बहाल केली. या प्रकरणानंतर गौतमी राज्यभर कार्यक्रम करताना दिसली. आता तर नेतेमंडळी कार्यक्रमात गौतमीला खासकरून आमंत्रित करू लागले आहेत. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी आणावी अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. त्यातच आता इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीच्या ग्रामस्थांनी गौतमीला गावात विरोध दर्शविला आहे. पुणे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात गौतमीचा कार्यक्रम होणार होता. मात्र गावच्या लोकांनी हा कार्यक्रम रद्द केला आहे. ग्रामस्थांनी एकमताने हा विचार मांडला असून गौतमीचा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे.
कार्यक्रमासाठी जागा सुद्धा देणार नसल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला, अशीही माहिती दिली जात आहे. गौतमीचे कार्यक्रम बंद व्हावेत म्हणून अनेकांनी प्रयत्न केले होते. मात्र माझ्या कार्यक्रमात आता कुठलाही अश्लीलपणा पाहायला मिळणार नाही. माझे नृत्य महिला देखील पाहतात असेही तिने म्हटले होते. गौतमी लवकरच मराठी चित्रपट सृष्टीत देखील पदार्पण करत आहे. घुंगरू या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे. मात्र एकीकडे तिची लोकप्रियता वाढताना पाहून तरुणाई भरकटत चालली आहे, असे मत सोशल मीडियावर व्यक्त केले जात आहे. नियोजित कार्यक्रमावर बंदी आणल्याने एकीकडे सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जाऊ लागल्या आहेत.