‘अगं अगं आई’ म्हटलं की महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील ओंकार भोजने रसिक प्रेक्षकांना लगेचच आठवतो. हास्यजत्रा मधील त्याचे सादरीकरण भन्नाट असते बऱ्याचदा हे प्रेक्षक त्याच्याच स्कीट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. पण हास्यजत्रा प्रेक्षकांसाठी एक खेदाची बाब म्हणजे ओंकारकडे आता नवनवीन प्रोजेक्ट ठेऊ लागल्याने तो हास्यजत्रा मध्ये पाहायला मिळत नाही. अर्थात त्याचे स्किट आता प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत. येत्या ३ नोव्हेंबर पासून झी मराठी वाहिनीवर फु बाई फु या कार्यक्रमाचे नवीन पर्व सुरू होत आहे.

ओंकारला फु बाई फु मध्ये झळकण्याची नामी संधी मिळाल्याने; त्याने हास्यजत्रा शो सोडला असे बोलले जात आहे. फु बाई फु च्या नवीन पर्वात चांगल्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात ओंकारची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाल्याने त्याने हास्यजत्रा सोडली असे त्याच्याबाबत बोलले जाते. मात्र हस्यजत्रेला आपला श्वास समजणारा ओंकार पुन्हा या शोमध्ये परत येणार आहे अशी खात्री सचिन गोस्वामी यांनी दिली आहे. सचिन गोस्वामी यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ओंकार हा हास्यजत्रेचा अविभाज्य घटक आहे. आमच्यातला तो सर्वात लोकप्रिय नट आहे. तो वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करू शकतो आणि म्हणूनच तो बाहेर सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे.

त्यामुळे त्याच्याकडे बरेचसे प्रोजेक्ट येत राहिले आहेत. याबाबत ओंकार आमच्याशी मनमोकळे पणाने बोलतो आणि नवीन प्रोजेक्टमध्ये काम करण्याची ईच्छा व्यक्त करतो. तेव्हा तो आता हिंदी चित्रपटात देखील झळकणार आहे. परंतु असं असलं तरी त्याने हा शो कधीही सोडलेला नाही. त्याचं काम झालं की तो पुन्हा या शोमध्ये येणार आहे. असे आश्वासन हास्यजत्राचे निर्माते दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी यावेळी दिले आहे. ओंकार भोजनेला महाराष्ट्राची हास्यजत्रामधुन अमाप लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे कुठल्याही नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करण्यासाठी तो हास्यजत्रा मधून ब्रेक घेताना दिसला आहे. आता जरी तो वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असला तरी देखील तो सोनी वाहिनीकडे नक्की परतणार आहे.
खरं तर ओंकार भोजने झी मराठी वाहिनीवर झळकणार असल्याने त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याचं मोठं स्वागत केलं आहे. ओंकारच्या विनोदी अभिनयातील वेगवेगळ्या भूमिकेत पाहताना प्रेक्षकांना नेहमीच आनंद होत असतो. चित्रपटातूनही त्याने विरोधी भूमिका साकारलेल्या आहेत. ओंकार प्रत्येक भूमिका चांगली वठवतो असा विश्वास त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. फु बाई फु या शोला देखील आजवर प्रेक्षकांकडून खुप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे हे नवीन पर्व ओंकारमुळे गाजणार अशी चर्चा जोर धरताना दिसत आहे. फु बाई फु मध्ये आणखी कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत याची झलक शोच्या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. या नवीन शोसाठी ओंकारचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.