प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन या गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या त्रासाला आता पुरत्या कंटाळल्या आहेत. सततच्या होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्याबद्दल बहुतेकांना नाहीत नसावे की सुधा चंद्रन या अभिनेते आणि दिगदर्शक के डी चंद्रन यांच्या कन्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच के डी चंद्रन यांचे निधन झाले त्यावेळी सुधा चंद्रन खूप भावुक झाल्या होत्या. सुधा चंद्रन यांचे कुटुंबीय मूळचे तामिळनाडूचे नंतर मुंबईत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. मिठीबाई कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले होते.

१९८१ साली वयाच्या १६ व्या वर्षी एका अपघातात त्यांचा उजवा पाय निकामी झाला होता. त्यामुळे त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. असे असले तरी त्यांनी आपल्या अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर चंदेरी दुनियेत स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्याच जीवनावर आधारित असलेल्या ‘मयुरी’ या तेलगू चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. नागीण, तुम्हारी दिशा, मालामाल विकली यासारख्या अनेक हिंदी, तेलगू चित्रपटात आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. एवढे असूनही त्यांची दखल घेत नसल्याची खंत त्यांनी एका व्हिडिओतून नुकतीच व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. सुधा चंद्रन यांना जेव्हा जेव्हा विमानाने प्रवास करावा लागतो तेव्हा सुरक्षा रक्षकांकडून त्यांना अडवण्यात येतं. सुधा चंद्रन यांना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या कृत्रिम पायाची सुरक्षा राक्षकांकडून तपासणी केली जाते. हा कृत्रीम पाय बसवायला आणि काढायला त्यांना नेहमी त्रास होत असतो, ही प्रक्रिया खुप वेळखाऊ आहे शिवाय कृत्रिम पाय काढताना आणि तो पुन्हा बसवताना त्यांना असह्य वेदना होत असतात.

दरवेळी होणारी ही प्रक्रिया त्रासदायक वाटत असल्याने अनेकदा त्यांनी स्फोटक ट्रेस डिटेक्टर वापरण्यास सांगितले मात्र त्याचा आजवर कुठलाच फायदा त्यांना झालेला नाही. ही वेदनादायी प्रक्रिया आता असह्य होत आहे असे म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. माझा हा व्हिडीओ सरकारपर्यंत पोहोचावा आणि यावर मला योग्य न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. सुधा चंद्रन यांच्या या विनंतीची दखल घेण्यात यावी यासाठी त्यांचा हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांनी देखील शेअर केलेला पाहायला मिळतो आहे. येत्या काही दिवसातच त्यांची ही मागणी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि त्यावर निश्चित अशा उपाययोजना आखण्यात येतील अशी आशा सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे आणि त्यांच्या वेदनेची दखल घेण्यात यावी अशी विनंती देखील केली जात आहे.
दरम्यान सुधा चंद्रन यांनी एक मुलाखत दिली त्यात त्या म्हणतात की ‘दरवेळी मला ह्या प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. परंतु मी सगळे नियम मोडावेत असं मला अजिबात वाटत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव ते हे सर्व काम करतात त्याचा मी नेहमीच आदर करते मात्र अशा वेळी काही जणांकडून जाणुन बुजून त्रास देण्यात येतो. नुकतीच या तक्रारीवर सिआईएसफच्या अधिकाऱ्यांनी माझी फोनवरून माफी देखील मागितली आहे. माझा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिल्यावर ज्योतीरादित्य सिंधीया यांनी पर्सनली मला फोन केला आणि मी स्वतः या गोष्टीत लक्ष्य घालेन असं आश्वासन दिलं आहे. माझ्या ह्या विनंतीची ज्यांनी ज्यांनी दखल घेतली आहे त्यांचे मी आभार मानते आणि लवकरच यावर उपाययोजना केल्या जातील अशी मी आशा करते’.