११ ऑगस्ट २०२२ रोजी आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाला. हिंदू धर्म, भारतीय सैन्य आणि शिखांच्या विरोधात भूमिका घेतल्याने या चित्रपटाला सर्वच स्तरातून कडाडून विरोध होऊ लागला. अनेकांनी या चित्रपटाविरोधात आवाज उठवून त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. आपल्या चित्रपटावर बहिष्कार घातला जातोय हे पाहून आमिर खानने मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कडाडून होणाऱ्या या विरोधामुळे आपला चित्रपट चालणार नाही याची खात्री पटलेल्या आमिर खानने स्वतः या गोष्टीची जबाबदारी घेतली. लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट १९९४ सालच्या फॉरेस्ट गम्प या चित्रपटावर आधारित आहे.
अतुल कुलकर्णी याने या चित्रपटाचे लेखन केले आहे. सुरुवातीला अतुल कुलकर्णी यांनी आमिर खानला चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यास दिली तेव्हा ती वाचण्यास आमिरने नकार दिला होता. बऱ्याच प्रयत्नानंतर शेवटी आमिर खानने चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली आणि ताबडतोब त्याला आपला होकार कळवला. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा देखील आमिर खानने सांभाळली आहे. मात्र चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आल्याने या चित्रपटाच्या अपयशाची बाजू आमिरने स्वीकारली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट आवडला नसल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली होती. तर बॉयकॉटमुळे हा चित्रपट चालणार की नाही अशीही चर्चा रंगली. चित्रपटाच्या प्रीमिअर शो साठी मराठी कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.
पण सहभागी कलाकारांवर मराठी प्रेक्षकांनी नाराजी दर्शविली होती. तब्ब्ल १८० कोटीचे बजेट असणारा लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १२ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमवला. यावरून प्रेक्षकांनी सरळ सरळ पाठ फिरविल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांकडून अल्पसा प्रतिसाद मिळाल्याने दुसऱ्याच दिवशी थिएटर मालकांनी चित्रपटाच्या स्कीनिंग कमी करण्याचा निर्णय घेतला. ओपनिंग शोला केवळ १० ते १२ प्रेक्षक आल्याने दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या तब्बल १३०० स्क्रिनिंग रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चर्चेत आहे. केवळ आमिर खानच नव्हे तर अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपट देखील असाच काहीसा अनुभव घेत आहे.
रक्षाबंधन चित्रपटाने पहिल्याच दिवशी ८ कोटींची कमाई केली. मात्र दुसऱ्या दिवशी याही चित्रपटाच्या १००० स्क्रिनिंग रद्द करण्यात येणार असे थिएटर मालकांनी जाहीर केले आहे. थिएटर मालकांचे नुकसान होत असल्याने, या चित्रपटांऐवजी प्रेक्षक पसंती देतील अशा चित्रपटांना स्क्रिनिंग देण्यात येईल असे स्पष्टीकरण याबाबत दिले गेले आहे. दरम्यान सुमित राघवन अभिनित एकदा काय झालं या मराठी चित्रपटाला प्राईम टाइम मिळत नसल्याची खंत सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांना बगल देत थिएटर मालक किमान महाराष्ट्रात तरी मराठी चित्रपटांना प्राधान्य देतील असे बोलले जात आहे.