प्रशांत दामले आणि हाऊसफुल्लचा बोर्ड हे समीकरण सर्वश्रुत आहे. पडद्यामागच्या गरजू कलाकारांना आर्थिक मदत करणारे, नाटक सुरू असतानाच परिस्थितीचा अंदाज घेत उत्स्फुर्त विनोद करणारे प्रशांत दामले यांची हि खास शैली रसिक प्रेक्षकांना अतिशय भावते. पुढील आठवड्यापासून नाट्यगृहे खुली होणार असून याची सूरूवात सुप्रसिद्ध मराठी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाने होणार आहे. अभिनेते प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या गाजलेल्या नाटकाचे पाच प्रयोग पुढील आठवड्यात पुणे आणि मुंबई येथील नामांकित नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहेत.
एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकात अभिनेते प्रशांत दामले आणि कविता लाड मेढेकर प्रमुख भूमिकेत असून अतुल तोडणकर, मृणाल चेंबुरकर, राजसिंह देशमुख, प्रतिक्षा शिवणकर आणि पराग डांगे यांच्या विशेष भूमिका आहेत. २३ ऑक्टोबर दुपारी ४.३० वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली, २४ ऑक्टोबर दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, २४ ऑक्टोबर सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंग मंदिर पुणे, ३० ऑक्टोबर दुपारी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली आणि ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता दिनानाथ नाट्यगृह विले पार्ले येथे होणार आहे. या पाचही प्रयोगांचे ऑनलाईन बुकिंग बुक माय शो साईटवरून करता येणार आहे, त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी लवकरात लवकर तिकिटे बुक करण्याचे आवाहन प्रशांत सरांनी व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे.
मनोज आणि मनीषा यांचे लग्न १८ वर्षांहून अधिक काळ लोटले आहेत. परंतु मनातील इच्छांच्या शोधात मधील काळात त्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले.. ते अद्यापही एकमेकांच्या प्रेमात आहेत की नवीन इच्छांचा पाठलाग करत पुढे मार्गस्थ होणार हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरेल.. जीवनाचा प्रवासातील हा हसण्याचा दंगा पाहण्यासाठी जरूर आपले तिकीट बुक झाल्याची खात्री करा.. “एक लग्नाची पुढची गोष्ट”