हिंदी रिऍलिटी शोमध्ये आजवर अनेक मराठी कलाकारांनी मानाचे स्थान मिळवले आहे. गायन क्षेत्र असो किंवा नृत्य क्षेत्रातही मराठी कलाकार सरस ठरलेले आहेत. ठाण्याच्या अशाच एका चिमुरडीने सारेगमपचा रिऍलिटी शो गाजवून आपल्या नावाचा डंका सर्वदूर पसरवला आहे. झी टीव्ही वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स हा रिऍलिटी शो नूकताच प्रसारित करण्यात आला आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी ३ ते १२ वर्षाखालील हजारो बाल गायकांनी सहभाग दर्शवला होता. मात्र या हजारोंमधून १२ सर्वोत्कृष्ट गायकांची निवड करण्यात आली.
यात महत्वाचं म्हणजे गायिका ज्ञानेश्वरी गाडगे हिने आपल्या सुरेल आवाजाने केवळ परिक्षकांनाच नाही तर देशभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ज्ञानेश्वरीने ऑडिशन राउंडमध्येच परिक्षकांची मनं जिंकली होती. शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असलेल्या ज्ञानेश्वरीने सर्वांना आपल्या गाण्याने प्रभावित केले होते. ज्या ज्या वेळी ज्ञानेश्वरीचा परफॉर्मन्स संपला; त्या त्या वेळी उपस्थितांना तिने उठून उभे राहायला भाग पाडले होते. एवढेच नव्हे तर अगदी अनु मलिक आणि शंकर महादेवन यांनी स्टेजवर येऊन ज्ञानेश्वरीचे कौतुकही केले आणि तिच्या पाया देखील पडले. साक्षात ज्ञानेश्र्वर माऊलींचा आशीर्वाद तुला लाभला आहे अशी प्रतिक्रिया शंकर महादेवन यांनी दिली होती.
ठाण्यात वास्तव्यास असलेल्या एका सर्वसाधारण गाडगे कुटुंबात ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. आई गृहिणी तर वडील गणेश गाडगे हे रिक्षाचालक. आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी त्यांनी आपल्या मुलींच्या पालनपोषणा बाबत कधीही हात राखला नाही. आपल्या रिक्षाला देखील ते आपले अपत्यच मानतात, हे या रिऍलिटी शोच्या मंचावर त्यांनी सांगून दिले होते. त्यांच्या दोन्ही मुली ज्ञानेश्वरी आणि कार्तिकी यांना अगदी लहान असल्यापासूनच संगीताची आवड होती. हे गुण हेरून त्यांनी या दोन्ही मुलींना संगीताचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी गाताना दिसली आहे. अनेक स्पर्धांमध्ये तिने उत्कृष्ट गायन कला सादर करून पारितोषिक देखील पटकावली आहेत.
१५ ऑक्टोबर पासून हा रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. शंकर महादेवन, अनु मलिक, नीती मोहन या परिक्षकांसोबत ऋषीकेश कामेरकर, वैशाली माडे हे मराठमोळे गायक मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. नुकताच या रिऍलिटी शोमध्ये गायक राहुल देशपांडे यांनी उपस्थिती लावली होती. ज्ञानेश्वरीचा परफॉर्मन्स पाहून राहुल देशपांडे तिच्यावर प्रभावित झाले. शिवाय याच ठिकाणी त्यांनी तिला आपली शिष्या बनवण्याचा निर्णय देखील घेतला. सध्या ज्ञानेश्वरीचा हा अफलातून परफॉर्मन्स तुफान लोकप्रियता मिळवताना दिसत आहे.