देवमाणूस या मालिकेला भली मोठी स्टार कास्ट लाभली होती. काही कालावधीनंतर याच मालिकेचा सिक्वल असलेली देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. बज्या, नाम्या, टोन्या, बाबू, मंगल, सरू आज्जी, डिंपल या पात्रांव्यतिरिक्त आणखी बरेचसे नवखे कलाकार या मालिकेतून भूमिका साकारताना दिसले. मात्र सुरुवातीलाच मालिकेतून वंदी आत्याची भूमिका वगळण्यात आल्याचे लक्षात आल्यावर प्रेक्षकांनी काहीशी नाराजी दर्शवली होती. वाड्यावर हक्क गाजवणारी आणि आपलाही या इस्टेटीत हिस्सा आहे. असे म्हणणारी बाबूची बहीण म्हणजेच वंदी आत्याला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच खूप मिस केले होते. मात्र नुकतीच या मालिकेतून वंदी अत्याची रिएंट्री झालेली पाहायला मिळत आहे.

वंदी आत्या हे कॅरॅक्टर प्रेक्षकांना खूप जवळचे वाटणारे आहे. आपला संसार सोडून काड्या लावणारी आणि भावाच्या सुखात खुसपट काढणारी बहीण पुष्पा चौधरी यांनी सुरेख बजावली होती. त्याचमुळे देवमाणूस २ या मालिकेतून त्यांची एन्ट्री कधी होणार याचीच प्रेक्षक वाट पाहत होते. परंतु प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपलेली पाहायला मिळत आहे. कारण नुकतीच वंदी आत्या या मालिकेत पुन्हा एकदा परतली आहे. पुष्पा चौधरी यांनी ही भूमिका आपल्या अभिनयाने सजग केली आहे. अभिनयासोबतच पुष्पा चौधरी या उत्तम गातात देखील. अनेक कार्यक्रमातून त्यांनी आपली ही कला सादर केली आहे. सामाजिक क्षेत्रात देखील त्या सक्रिय आहेत. दिलासा सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या त्या विश्वस्त आहेत.

अनाथांना कपडे, जेवण पुरवणे असे विविध उपक्रम त्या या संस्थेमार्फत करत असतात. या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी अभिनय क्षेत्रात खूप उशिरा प्रवेश केला. या प्रवासात त्यांनी जवळपास ३० चित्रपट, वेबसिरीज, मालिका, शॉर्टफिल्म, नाटक अशा विविध क्षेत्रात डंका वाजवला. एवढेच नाही तर मॉडेलिंग करत असताना मिसेस कॉन्फिडन्स, सुपर वुमन, बेस्ट स्माईल अशा स्पर्धा त्यांनी जिंकल्या. देवमाणूस २ या मालिकेत त्या पुन्हा एकदा वंदी आत्या साकारत आहेत. आपल्या हयातीत बाबूला डिंपलचे डॉक्टरसोबत लग्न व्हावे अशी ईच्छा आहे. तर डिंपल आता डॉक्टरसोबत लग्न व्हावे म्हणून उपोषणाला बसली आहे. त्यामुळे ही मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.