देवमाणूस २ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवीन पात्रांची एन्ट्री करण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत मार्तंड जामकर ही दमदार भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे यांनी साकारली आहे. मार्तंडाच्या अफलातून क्लुप्त्यांमुळे प्रेक्षकांचे अतिशय मनोरंजन होत आहे. त्यांच्या येण्याने डॉक्टर आणि डिंपल मात्र पुरते अडकलेले पाहायला मिळत आहे. या जामकरांची नजर डिंपल आणि डॉक्टरांच्या हालचालीकडे लागूली आहे. त्यात भरीस भर म्हणून की काय आमदार मॅडम देखील आता डॉक्टर आणि डिंपलच्या मागे हात धुवून असलेल्या पाहायला मिळत आहे.

मधूची जमीन डॉक्टरने बळकावली असल्याने ती मिळवण्यासाठी आमदार मॅडम कुठलाही मार्ग स्वीकारायला तयार झाली आहे. डॉक्टर आणि डिंपल दोघांनाही आमदार मॅडमच्या लोकांनी पकडून आणले होते आणि त्यांना धमकावण्यात आले होते. त्यामुळे मधूची जमीन डॉक्टर आमदार मॅडमला देणार की तिलाच आपल्या जाळ्यात अडकवणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच आमदार मॅडमच्या पात्राची एन्ट्री करण्यात आली. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला बहुतेकांनी ओळखलेही असेल. कारण मकरंद अनासपुरेसोबत ही अभिनेत्री नायिकेची भूमिका साकारताना दिसली होती. या अभिनेत्रीचे नाव आहे तेजस्विनी लोणारी.

तेजस्विनीचे बालपण पुण्यातच गेले, लहानपणापासूनच तिने जाहिरात क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. शाळेच्या सुट्टीमध्ये ती दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत काम करायची. नो प्रॉब्लेम हा तिने अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर तेजस्वीनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत आणखी काही चित्रपटात झळकली. दोघात तिसरा आता सगळं विसरा, बाप रे बाप डोक्याला ताप, वॉन्टेड बायको नं १, चिनी, बर्नी या चित्रपटातून तिने मुख्य भूमिका साकारल्या. चित्तोड की राणी पद्मिनी का जोहर या हिंदी मालिकेतून तेजस्विनीला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. गेल्या बऱ्याच वर्षांपासून तेजस्विनी अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली होती.
सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. मधल्या काळात तिने सामाजिक बांधिलकी जपत भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी चतुर्थी अॅनिमल फाउंडेशनची स्थापना केली. रस्त्यावरील भटकी कुत्री आणि मांजरीना काही दुखापत झाली असेल तर ती या फाउंडेशन अंतर्गत मदत करते. बऱ्याच कालावधीनंतर देवमाणूस २ या मालिकेत तिला पुन्हा एकदा अभिनयाची संधी मिळाली आहे. या मालिकेत ती आमदार मॅडमची भूमिका साकारत आहे. या नव्या भूमिकेसाठी तेजस्विनी लोणारी हिला खूप खूप शुभेच्छा!