झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती मात्र मालिकेचा शेवट अर्धवट राहिल्याने आणि डॉ अजितकुमार देव ला शिक्षा न झाल्याने ह्या मालिकेचा सिकवल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देवमाणूस २ या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाल्याचे श्वेता शिंदेने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यामुळे ती परत आलीये ह्या मालिकेच्या जागी आता देवमाणूस ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डॉक्टरची भूमिका अभिनेता किरण गायकवाड याने सुरेख बजावली होती.
मालिकेच्या सिक्वलमध्ये डॉक्टरच्या भूमिकेसाठी त्याचीच वर्णी लागणार आहे हे निश्चित झालं आहे. लवकरच मालिकेतील अन्य कलाकारांचा देखील उलगडा होईल पण एकीकडे मालिकेची उत्सुकता असतानाच डॉ अजितकुमार देव यांचा पुतळा जोरदार चर्चेत आला आहे. हा पुतळा मुंबईत बसवण्यात आला असल्याची चर्चा रंगली आहे. मालिकेतील डॉक्टर अजितकुमार देवचा पुतळा सोशल मीडियावर पाहिला जातोय आणि हा पुतळा मुंबईत बसवण्यात आला असल्याचे त्याबाबत म्हटले जात आहे मात्र हा पुतळा उभारण्यामागचे सत्य काय आहे हे नुकतेच समोर आले आहे. देवमाणूस मालिकेच्या शेवटच्या भागात डॉक्टर अजितकुमार देव आणि चंदाचा मृत्यू झाल्याचा समज सर्व गावकऱ्यांनी केलेला असतो. आणि असेच चित्र गावकऱ्यांसमोर निर्माण करण्यात डॉक्टर यशस्वी ठरलेला पाहायला मिळतो. मात्र शेवटच्या क्षणी अजितकुमार एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना दाखवल्याने या मालिकेचे गूढ प्रेक्षकांपुरते तरी वाढलेले दिसले. मात्र अजितकुमार ज्या गावात राहत असतो त्या कातळवाडीच्या ग्रामस्थांनी त्याचा मृत्यू झाल्याचे समजून गावात त्याचा पुतळा उभारण्यात आलेला या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
गावकऱ्यांसाठी अजितकुमार देव हा देवमाणूस असतो. वेळीअवेळी तो सगळ्यांच्या मदतीला धावून येतो. त्यामुळे तो आपल्यासाठी देवमाणुसच आहे असेच चित्र त्यांच्या मनात निर्माण झालेले असते. गावकऱ्यांसाठी देवमाणूस ठरलेला डॉ अजितकुमार देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचा पुतळा ग्रामस्थांनी त्यांच्या कातळवाडी या गावात उभारला आहे. हाच पुतळा सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा पुतळा केवळ मालिकेचा एक भाग म्हणून आणि केवळ मालिकेपुरताच तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आला आहे. नुकताच या पुतळ्याचा व्हिडीओ किरण गायकवाड याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमुळे मालिकेची उत्कंठा तर अधिकच वाढली असल्याने ही मालिका लवकरात लवकर प्रेक्षकांना पाहायला मिळावी अशी आशा व्यक्त केली जात आहे. मालिकेच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण नुकतेच झाले असून येत्या काही दिवसातच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.