डॉक्टरची सततची कटकारस्थाने पाहून प्रेक्षकांनी देवमाणूस २ या मालिकेवर नाराजी दर्शवली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या एंट्रीने मालिकेत रंजक वळण आलेले पाहायला मिळाले. मिलिंद शिंदे हे मराठी सृष्टीतील तगडे अभिनेते म्हणून ओळखले जातात. चित्रपट तसेच मालिकांमधून साकारलेल्या त्यांच्या बहुतेक भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत अशातच देवमाणूस २ मालिकेत झालेली त्यांची एन्ट्री पाहून प्रेक्षक पुन्हा या मालिकेकडे वळले आहे. मार्तंड जामकरची एन्ट्री डॉक्टरला मात्र नाहक त्रास देणारी ठरणार आहे त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक मार्तंड जामकरवर प्रचंड खुश आहेत. आता मार्तंड जामकर डॉक्टरच्या मागे हात धुवून लागले आहेत.

डॉक्टरला कोण मदत करतं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी नाम्याला बोलावलेले असते. नाम्या जामकरांना पाताळ कंगणीच सिक्रेट सांगतो. पाताळ कंगणी डॉक्टरला पैसे डबल करून देतो हे जामकरला आता समजले आहे. एकीकडे जामकरच्या तावडीतून कसं निसटायचं याच्या विचारात असतानाच दुसरीकडे मॅडम डॉक्टरला भेटायला बोलावते. मधूची जमीन त्याने लाटलेली असते. ही जमीन मिळवण्यासाठी ती आपल्या माणसांना डॉक्टरांकडे पाठवते. परंतु मॅडमने आपली भेट नाकारलेली असते त्यामुळे ही बाई खूपच हुशार आहे किंवा तिचा काहीतरी वेगळा प्लॅन असावा असा विचार डॉक्टर करतो. शेवटी त्याला गुंडांचा फोन येतो.

मॅडमनी बंगल्यावर बोलावलं असे म्हणताच डॉक्टर खुश होतो. मार्तंडने डिंपलला चौकशीसाठी बोलावलेले असते. आपल्या देवमाणसाला हा मार्तंड त्रास देतोय हे गावकऱ्यांना पटत नसते. म्हणूनच हे प्रायश्चित्त करण्यासाठी जामकर वाड्यात येऊन डॉक्टरची माफी मागतो आणि आपल्या घरी जेवायला बोलावतो. साग्रसंगीत जेवण केलं आहे जेवण समोर मांडून तो साग्र झालं आता संगीत हवं असे म्हणून जामकर डान्स करायला लागतो. ‘कंगणी कंगणी’ त्याचा हा डान्स पाहून डिंपल आणो डॉक्टरला मात्र घाम फुटतो. आपल्याला मॅडमनी भेटायला बोलावलं असतानाच जमकरचा हा पाहुणचार मात्र या दोघांनाही महागात पडणार असेच चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.
हळूहळू डॉक्टर आणि डिंपल मार्तंडच्या जाळ्यात ओढली जात असल्याचे पाहून प्रेक्षक मार्तंडवर भलतेच खुश झालेले आहेत. अशातच मार्तंडचा डान्स डिंपल आणि डॉक्टरला धडकी भरायला लावणारा आहे. त्यामुळे आता मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. डॉक्टरची कारस्थानं लवकरात लवकर उघडकीस यावी अशी प्रेक्षकांची ईच्छा आहे. ही ईच्छा कधी पूर्ण होणार याचीच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.