झी मराठीवरील देवमाणूस २ ही मालिका एका धक्कादायक ट्विस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या आहेत. डॉक्टरच्या भरवश्यावर नाम्या गावकऱ्यांकडून पैसे गोळा करतो आणि त्याबदल्यात त्यांना दुप्पट मोबदला देण्याचे आश्वासन देतो. या हव्यासापोटी नाम्या स्वतःचा मॉल गमावून बसतो. नाम्याने स्वतःची पतपेढी सुरू केलेली असते. मात्र आपले पैसे परत मिळावेत म्हणून नाम्याच्या पतपेढीवर गावकरी हल्ला चढवतात आणि त्याची पतपेढी जाळून टाकतात. नाम्याचा मित्र बज्या गावकऱ्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करतो मात्र गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यापासून त्याला पतपेढी वाचवणे शक्य होत नसते.

आपली पतपेढी जाळली हे जेव्हा नाम्याला कळते तेव्हा नाम्याला खूप रडू कोसळते. आपले आणि गावकऱ्यांचे पैसे डॉक्टरांनी बुडवले, याचा जाब तो विचारायला निघतो तेव्हा बज्या त्याला अडवतो. डॉक्टर देवमाणूस आहे त्यांनी काही केलेलं नाही असं सांगतो. तेव्हा नाम्या जीव तोडून बज्याला आणि वाड्यातील सर्वांना डॉक्टरांच्या कारस्थानापासून सावध राहायला सांगतो. मात्र त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. बज्या नाम्याला वाड्याच्या बाहेर घालवतो आणि इथेच बज्या आणि नाम्याच्या मैत्रीत दुरावा आलेला पाहायला मिळतो. यानंतर मात्र डॉक्टर नाम्याचा काटा काढणार असेच चित्र समोर दिसून येते. मालिकेतून येत्या काही भागात डॉक्टरचे कारस्थान वाढलेले पाहायला मिळणार आहे.

एक नवा धक्कादायक ट्विस्ट मालिकेच्या प्रोमोमधून समोर आला आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गावातील मंडळी उपस्थित असतात. त्यावेळी मंगलताई, टोण्या रडताना दिसतात. या ट्विस्टमुळे डॉक्टरांनी नाम्याचा तर काटा नाही ना काढला? अशी पुसटशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. नाम्या आपल्या विरोधात जाऊन पोलिसांना खरं तर सांगणार नाही ना, या हेतूने अजितकुमार नाम्याला संपवणार असल्याची चिन्ह दिसू लागली होती. नाम्याला काही करायचं नाही असं डिंपलने डॉक्टरला बजावून सांगितले होते. त्यामुळे डॉक्टरचा पुढचा निशाणा नाम्यावर तर नसणार ना असेच प्रेक्षकांच्या मनात येत आहे. हा ट्विस्ट नेमका काय आहे हे येत्या भागातच अधिक स्पष्ट होईल.