दीपक देऊळकर हे मराठी मालिका, चित्रपट नाट्य अभिनेते म्हणून ओळखले जातात. श्रीकृष्ण या गाजलेल्या हिंदी मालिकेत त्यांनी साकारलेली बलरामची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. खरं तर अभिनयापेक्षा क्रिकेट खेळाचे वेड त्यांना जास्त होते. मुंबईत अंडर १९ संघात ते फिरकी गोलंदाज म्हणून कार्यरत होते. परंतु खेळ खेळत असताना त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली त्यामुळे क्रिकेट विश्वाला त्यांना मुकावे लागेल.
नवरा माझ्या मुठीत गं, सासर माझे भाग्याचे, पाठराखिण, लेक लाडकी ह्या घरची, दामिनी, बंदिनी, सासर माहेर या आणि अशा अनेक चित्रपट मालिकेतून त्यांनी कधी सहनायक, खलनायक तर कधी चरित्र भूमिका साकारल्या. ईश्वरी व्हिजनची निर्मिती करून त्यांनी श्री गुरुदेव दत्त मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आणली. दीपक देऊळकर यांची पत्नी म्हणजे अभिनेत्री निशिगंधा वाड होय. वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि ती त्यांना पुढे ९ वर्षे मिळत राहिली. निशिगंधा वाड या १९८५ मध्ये झालेल्या १० वीच्या परीक्षेत पहिल्या पन्नासात आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसर्या आल्या होत्या. पदवीधर होईपर्यंत त्या मुंबईच्या रूपारेल कॉलेजात होत्या आणि नंतर रुईया कॉलेजात. निशिगंधा वाड यांनी हिंदी आणि मराठी सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
दीपक देऊळकर आणि निशिगंधा वाड हे मराठी सृष्टीतलं लाडकं कपल म्हणून ओळखल जातं. शेजारी शेजारी, नवरा माझ्या मुठीत गं, तुमको ना भूल पायेंगे, दादागिरी, दिवानगी, एका पेक्षा एक, अशी ही ज्ञानेश्वरी, बाळा जो जो रे, आव्हान, ससुराल सीमर का अशा हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटातून त्यांनी प्रमुख भूमिका बजावल्या. या शिवाय निशिगंधा वाड सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्री म्हणून परिचयाच्या आहेत. काही मुलींना त्यांनी दत्तक देखील घेतले असल्याचे बोलले जाते. तर आजवर अनेक गरजूना त्यांनी नेहमीच मदत केली आहे. दीपक देऊळकर आणि निशिगंधा वाड यांना ईश्वरी ही एकुलती एक मुलगी आहे. ईश्वरी अभ्यासात हुशार असली तरी श्री गुरुदेव दत्त मालिकेच्या सेटवर नेहमी भेट देण्यासाठी येत असते. भविष्यात ती देखील कलाक्षेत्रात येऊन आपल्या आई वडीलांप्रमाणे काहीतरी कमाल घडवून आणेल याबाबत खात्री वाटते…