साधारण सात दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा भीषण अपघात झाल्याची बातमी पसरली होती. गंभीर अपघातामुळे त्यांच्या मणक्याला जबरदस्त दुखापत झाली, या खेरीज त्यांच्या उजव्या पायाला देखील भयंकर मार लागला होता. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर देखील मार लागल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली दिसत होती. पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याने त्यांना कुठलीच हालचाल करणे शक्य होत नव्हते, त्या अवस्थेत त्यांनी प्रेक्षकांना माझ्यासाठी प्रार्थना करा अशी विनंती केली होती. वर्षा ताईंची अशी अवस्था पाहून त्यांच्या चाहत्यांनीच नव्हे तर तमाम प्रेक्षकांनी लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तितक्याच तत्प्रेतेने पुनरागमन करावे अशा आशा व्यक्त केल्या.
वर्षा दांदळे यांची अपघाताची बातमी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यत जाऊन पोहोचली आहे. त्यांनी वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची दखल घेतली आहे. याबाबत नुकताच वर्षा दांदळे यांनी देखील खुलासा करत सांगितले की, “बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका व अभिनेत्री श्रीमती वर्षा दांदळे यांच्या अपघाताची बातमी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समजताच त्यांनी श्रीमती वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिक येथे जाऊन त्यांची भेट घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांची नाशिक येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली तसेच तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच पुन्हा आपण चित्रपट क्षेत्रात नव्या उत्साहाने, उमेदीने काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, अशा शुभेच्छा दिल्या. यासोबतच आजारातून लवकर बरे होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली. याप्रसंगी नगरसेविका सिंधू मसुरकर उपस्थित होत्या.
“धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद महापौर मॅडम, कलाकाराला तुमच्या राज्यात मान आहे प्रेम आहे शतशः प्रणाम”.. असे म्हणून वर्षा ताईंनी या सर्वांचे आभार मानले आहेत. वर्षा दांदळे या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. एक शिक्षिका ते उत्तम अभिनेत्री असा त्यांचा आजवरचा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे. नांदा सौख्य भरे या मालिकेतील वच्छी आत्याच्या भूमिकेने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली होती. नकटीच्या लग्नाला यायचं हं, घाडगे अँड सून, पाहिले न मी तुला अशा काही मालिका आणि नाटकातील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनि नेहमीच पसंती दर्शविलेली आहे. त्यांच्यातच जीवनावर आधारित एका नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन देखील केले होते. आज आपल्या अभिनय क्षेत्रातील योगदानाची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचे पाहून त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. अभिनेत्री वर्षा दांदळे या दुखपतीतून लवकर बऱ्या होतील आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने अभिनय क्षेत्रात पुनः पदार्पण करतील ही सदिच्छा…