छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास सर्वांना परिचित आहे. तसेच आजवर अनेक चित्रपट आणि मालिकेतून त्यांच्या कार्याची प्रचिती समोर आली आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास सांगणारा अजून एकही चित्रपट आलेला पाहायला मिळाला नाही. याच अनुषंगाने “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
हा जगातील पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट असणार आहे जो मराठी आणि इंग्रजी भाषेत चित्रित होणार आहे. शौर्य, धैर्य अन् पराक्रमाची ज्वलंत आख्यायिका सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी छत्रपती ताराराणींची भूमिका साकारणार आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, ‘प्लॅनेट मराठी’, ‘गोल्डन रेशो फिल्म्स’, ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ’ आणि ‘ओरवो स्टुडिओज्’ यांची निर्मिती असलेल्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच लॉन्च झालं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव करणार असून कथा लेखन आणि संवाद लेखन डॉ सुधीर निकम यांनी केलं आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटात महाराणी ताराराणींची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने एक पोस्ट लिहिली होती. त्यात ती या चित्रपटाबद्दल म्हणाली होती की, “छत्रपती ताराराणींचं प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर आणण्याचं भाग्य लाभणं म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे..
पण त्याच बरोबरीने आजवर ज्या रणरागिणी विषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात फार काही केलं गेलं नाही, तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणं हे अत्यंत आव्हानातमक काम असेल, या जबाबदारीची जाणिवही मला आहे. महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो, आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचं बळ भरावं बास हीच प्रार्थना”. सोनी मराठी वाहिनीवर येत्या १५ नोव्हेंबर पासून महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारित “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे हि ताराराणींची भूमिका निभावणार आहे. छोट्या पडद्यासोबतच आता मोठ्या पडद्यावर देखील प्रेक्षकांना महाराणी ताराराणी यांचा इतिहास समजणार आहे त्यामुळे याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.