झी मराठी वाहिनीने आजवर अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून वाहिनीचा टीआरपी घसरलेला होता. लोकप्रियता वाढवण्यासाठी झी मराठी वाहिनीने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झी ने दुपारी देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी यशोदा आणि लवंगी मिरची या दोन नव्या मालिका आणल्या. तर येत्या १३ मार्चपासून तुला शिकवीन चांगलाच धडा ही आगळी वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासोबतच आता झी मराठी भयपटावर आधारित आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. येत्या २७ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता चंद्रविलास ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.
मालिकेत सागर देशमुख आणि वैभव मांगले महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. वैभव मांगले या मालिकेतून भुताची भूमिका साकारत आहेत. झी मराठी वाहिनी आज दिवसभर उलटया पोस्ट शेअर करत होती. या नवीन मालिकेच्या प्रमोशनसाठी त्यांनी ही अनोखी शक्कल लढवली होती. याचा परिणाम सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणावर दिसून आला. उलट्या पोस्टमुळे प्रेक्षकांचे लक्ष्य वेधले गेले होते. याचा उलगडा झाल्यानंतर नव्या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. आणि ही मालिका पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. चंद्रविलास या नव्या मालिकेच्या अगमनामुळे झी मराठीची एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निरोप घेत असलेली मालिका आहे तू तेव्हा तशी.
स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे निश्चित झाले आहे. यासोबतच आता नव्या मालिकेचेही स्वागत प्रेक्षकांनी केले आहे. रात्रीस खेळ चाले या भयपटावर आधारित मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. यानंतर रात्रीस खेळ चाले मालिकेचे दोन सिक्वल बनवण्यात आले. मात्र तिसऱ्या सिजनला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळाल्याने आणि अपूर्वा नेमळेकरने मालिका सोडल्याने प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर आता अशाच काही धाटणीची चंद्रविलास ही नवी मालिका प्रेक्षकांच्या समोर आणली जात आहे. या मालिकेला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील अशी आशा आहे. मालिकेतला हा थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून एक महिना तरी वाट पाहावी लागणार आहे.