गेल्या दोन वर्षापूर्वी चंद्रमुखी या चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आले होते. त्यावेळी चंद्राची मुख्य भूमिका प्राजक्ता माळी साकारणार अशी चर्चा रंगली होती. मात्र ही भूमिका अमृता खानविलकर साकारणार असल्याचे उघडकीस आले. त्यावेळी प्राजक्ताच्या चाहत्यांनी थोडीशी नाराजी दर्शवली होती. अर्थात अमृता चंद्राची भूमिका तितक्याच ताकदीने पेलणार असल्याची खात्री असली तरी प्राजक्ता माळी देखील या चित्रपटाचा एक भाग बनणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी देखील आता आनंद व्यक्त केलेला पाहायला मिळत आहे. बहुतेक जुन्या तमाशाप्रधान चित्रपटात सवाल जवाबचा खेळ रंगलेला पाहायला मिळाला आहे.
मंचावर जर दोन फडांचे तमासगीर एकाच वेळी असतील, तर त्यांच्यातील सरस कोण हे ठरवण्यासाठी आपापसात सवालजवाब होतात. पौराणिक कथांवर आधारलेले कूटप्रश्न एकमेकांना काव्यांतून विचारून त्यांची उत्तरे ओळखण्याचा हा कार्यक्रम असतो. चंद्रमुखी या चित्रपटात देखील हा खेळ रंगलेला पाहायला मिळणार आहे. प्रसाद ओकला आपल्या चंद्रमुखी चित्रपटात सर्व काही ओरिजनल असावं असा त्याचा अट्टाहास होता. यामुळे अमृताला कितीतरी वेळा नाक टोचावे लागले होते. चित्रपटात ओरिजनल नऊवारी साडी, पारंपरिक नथ, दागिने असावे म्हणून या नायिकांना मोठी मेहनत घ्यावी लागली आहे. अशीच मेहनत प्राजक्ताने देखील घेतलेली पाहायला मिळाली आहे.
नुकतेच चित्रपटातील एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात प्राजक्ता माळी नैना चंद्रापुरकरची भूमिका साकारणार आहे. चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकर आणि नैना चंद्रापुरकर यांच्यात सवाल जवाबचा हा खेळ रंगलेला पाहायला मिळत आहे. प्राजक्ताने या चित्रपटातील आपला लूक प्रेक्षकांसमोर आणला आहे. कशी वाटली नैना चंद्रापुरकर? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना विचारला आहे. ‘मला तर बुवा शिवलेली नव्हे तर खरी नऊवारी नेसून, सगळे खरे सोन्या मोत्याचे दागिने घालून, प्रिय अमृताला खडूस नेत्रकटाक्ष देत नाचायला जाम मज्जा आली’ असे म्हणत प्राजक्ताने अमृताची फिरकी घेतलेली पाहायला मिळाली.
या चित्रपटात अशोक शिंदे यांनी शाहीर उमाजीराव जुन्नरकरची भूमिका साकारली आहे. म्हणजेच अशोक शिंदे चंद्रमुखी चित्रपटात चंद्राच्या वडिलांची भूमिका निभावताना दिसणार आहेत. रुबाबदार उद्योगमंत्री दौलत देशमानेच्या मुख्य भूमिकेत आदिनाथ कोठारे आणि सोबत मृन्मयी देशपांडे, मोहन आगाशे, समीर चौघुले, राधा सागर, सुरभी भावे, स्मिता गोंदकर अशी जाणती कलाकार मंडळी आहेत. येत्या २९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनची जोरदार तयारी पाहता हा चित्रपट चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी नक्कीच खेचून आणणार असा विश्वास आहे.