मराठी कला क्षेत्रात सध्या लग्नसराई पाहायला मिळत नसली तरी, एक प्रसिद्ध कपल लवकरच विवाहबद्ध होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. ब्राईड टू बी असे म्हणत या अभिनेत्रीने बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. ही अभिनेत्री दुसरी तीसरी कोणी नसून तुझ्यात जीव रंगला फेम पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर आहे. तुझ्यात जीव रंगला या एका मालिकेमुळे अक्षया देवधर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. या दोघांनीही खऱ्या आयुष्यात लग्न करावे असे त्यांच्या चाहत्यांनी त्यांना सुचवले होते.

चाहत्यांचे म्हणणे या दोघांनाही पटले आणि या दोघांनी लग्न करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. खरं तर मालिकेतून एकत्रित काम करत असताना अनेकांची मनं जुळतात. मात्र आता आपण लग्न करायला हवं हे तेव्हाच सुचतं तेव्हा हे दोघेही आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात. हार्दिक आणि राणादा यांच्यात खूप साम्य आहे असे हार्दिक म्हणतो. राणाला व्यायाम करायला आवडतो, त्याला प्राण्यांची आवड आहे. खऱ्या आयुष्यात देखील मी तसाच आहे मालिकेतून एकत्रित काम करताना मी अक्षयाच्या प्रेमात पडलो. अशी कबुली त्याने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने दिली आहे. मालिकेमुळे आम्हाला खूप प्रेम मिळाले, खास करून कोल्हापूर वासीयांनी आम्हाला जे प्रेम दिलं ते आयुष्यात न विसरण्यासारखं आहे. म्हणूनच आम्ही आमच्या लग्नसोहळ्यात कोल्हापूरचे वैशिष्ट्य असलेला पेहराव करणार करणार आहोत. लग्नासाठी लागणारे कपडे आम्ही कोल्हापूर मधूनच मागवलेले आहेत असे हार्दिक यावेळी स्पष्ट करतो.

नुकतेच हार्दीकने त्याच्या बहिणीच्या घरी जाऊन केळवण साजरे केले आहे. तर अक्षयाने देखील आपल्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी साजरी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच हार्दिक आणि अक्षया यांचा विवाह संपन्न होणार आहे.सध्या अक्षया आपल्या मैत्रिणींसोबत पोंडेचेरीला गेलेली आहे आणि इथेच तिने तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी साजरी केली आहे. लग्नाआधी आपणही एक छानशी बॅचलर पार्टी साजरी करावी अशी अक्षयाची मनापासून ईच्छा होती. त्यासाठी या ट्रिपचे तिने आयोजन केले होते. लवकरच लग्न करत असल्याचे सांगत ब्राईड टू बी म्हणत तिने काही खास क्षण शेअर केले आहेत. हार्दिक यावेळी केळवण साजरं करत असल्याने अक्षया या सोहळ्याला मिस करत असल्याचे सांगते. लवकरच पुण्यातील कोथरूड परिसरात पंडित फार्म या ठिकाणी अक्षया आणि हार्दिक जोशी विवाहबद्ध होत आहेत. लग्नसोहळ्याचा हा थाट पाहण्यासाठी त्यांचे चाहते मात्र नक्कीच उत्सुक असणार आहेत.