सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गौरी आणि जयदीप यांच्या दुसऱ्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे मालिकेतील सर्व कलाकारांनी वेगवेगळे गेटअप केलेले पाहायला मिळत आहेत. त्यात विशेष म्हणजे अभिनेत्री अपर्णा शार्दूल यांनी मराठी सृष्टीतील लोकप्रिय नायिका रंजना हिचा गेटअप केलेला पाहायला मिळतो आहे. हा गेटअप करताना अपर्णा शार्दूल हिने एक गोड आठवण सांगितली आहे. याबाबत तिने एक पोस्ट लिहिली आहे.
अपर्णा म्हणते की, रंजना आणि मी? सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत सध्या लग्नाची धूम सुरु आहे. आणि लग्नाच्या एका कार्यक्रमात मी, ‘बिन कामाचा नवरा’ ह्या चित्रपटातील, “अगं अगं म्हशी तू मला कुठे नेहशी” ह्या गाण्यावर मी आणि माझ्या नवऱ्याची भूमिका करणारे गणेशदादा डान्स फोटोची पोज देणार आहोत. भरतनाट्यम शिकलेली असल्यामुळे तो डान्स कसा प्रिसाईज होईल वगैरे डोक्यात चालू होतं. पण मग, लुक करणार, सेम रंजना अशोक सराफ होणार वगैरे कळलं. मी कशी दिसेल रंजना..? असं वाटलं. पण ते साकार झालं. तुम्ही सगळे बघालही! स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन ह्यांचे खूप खूप आभार! आमची कॅमेरा मागे धडपड करणारी टीम त्यांचे तर विशेष आभार! मी साधारण दहा बारा वर्षांची असेल तेव्हा अचानक एक दिवस पपांनी मला “अपर्णा… ए… माझी रंजना…” अशी हाक मारली होती. मी, “कोण रंजना…?” असं विचारल्यावर त्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे मला देता येईल तितकी माहिती दिली.
त्यावेळी गुगल नव्हते, त्यामुळे फोटो बघता आला नाही. पण पुढे कधीतरी रंजना टीव्हीवर दिसायच्या, पपांनी एकदा आवर्जून दाखवल्या. “ते बघ… अशी नजर पाहिजे.” मी बघतच होते. त्यांचा तो गालावरचा तीळ आणि अतिशय शार्प नजर कायम लक्षात राहिली. तो सिक्वेन्स शूट करायच्या दिवशी मी आरशासमोर होते आणि सगळ्यात शेवटी तो तीळ पण काढला. सगळे मला म्हणाले, “सेम दिसते आहेस गं…” मला पण जरा माज आला. मस्त हवेत गेले. मनात आलं, “पपा… मी तर खरेच रंजना दिसते का हो? डोळे पण घारे आहेत माझे… हो यार…” पण एकदम थांबले. पपा असते तर म्हणाले असते, “पण नजर…? त्याचं काय? तिची सर तुला नाही…” मी परत रियलीटी मध्ये आले. पपा कायम हा रियलीटी चेक द्यायचे. मी शांतपणे शूट पार पाडलं. घरी आले. झोपले. ह्या अनुभवातून एकच लक्षात आलं, पपा आणि रंजना सारख्या मोठ्या नटीमुळे आपले पाय जमिनीवर राहतात.