मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर २ ऑक्टोबर रोजी प्रसारित केला जात आहे. या ग्रँड प्रीमिअर मधून बिग बॉसच्या घरात १६ सदस्यांची ग्रँड एन्ट्री होणार आहे. हिंदी बिग बॉसच्या तुलनेत मराठी बिग बॉसला आता प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या सिजनला देखील प्रेक्षक तेवढेच आतुर झालेले आहेत. बिग बॉसच्या घरात कोणकोणते सदस्य सहभागी होणार याची उत्सुकता असतानाच पहिल्या सदस्याची या घरात ग्रँड एन्ट्री झाली आहे. ही सदस्य कोण आहे याची उत्सुकता अधिक ताणून न धरता त्याबाबत उलगडा करून घेऊयात.
बिग बॉसच्या घरात पहिली सदस्य एन्ट्री घेणार आहे तिची झलक शोच्या पहिल्या प्रोमोमधून समोर आली आहे. अनेक प्रेक्षकांनी या सदस्याला ओळखले आहे तर अनेजण याबाबत संभ्रमात आहेत. घरात दाखल होणारी ही सदस्य आहे समृद्धी जाधव. समृद्धी जाधव ही मॉडेल आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. पुण्यात तिचे बालपण गेले असून मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधून तिने मॉडेलिंगचे धडे गिरवले आहेत. कॉलेजमध्ये असताना तिने अनेक नामवंत फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक केलं. समृद्धीचे वडील शंकरराव जाधव हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये डेप्युटी कलेक्टर आहेत. शाळेमध्ये असताना समृद्धीने हॉर्स रायडिंग, जिम्नॅस्टिक, डान्सचे धडे गिरवले.
सोबतच पाच वर्षे तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून पदवी मिळवताना तिने स्पेक्ट्रम २०१७ सालच्या फेस्टिव्हल मध्ये सहभाग घेतला होता. २०२१ साली एमटीव्हीच्या स्प्लिट्सव्हीलाच्या रिऍलिटी शोमध्ये समृद्धीने सहभाग घेतला होता. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर समृद्धीला मोठी लोकप्रियता मिळाली यातूनच काही जाहिरातींसाठी तिला मॉडेल म्हणून काम मिळाले. आता मराठी बिग बॉसच्या घरात समृद्धीने एन्ट्री घेतली आहे. बिग बॉसच्या शोमध्ये दाखल होण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात. हिंदी रिऍलिटी शो गाजवलेले मराठी कलाकार शिव ठाकरे, मीनल शाह आणि जय दुधाने यांनी देखील अशाच पद्धतीने मराठी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती.
समृद्धीला देखील अशाच शोमुळे एन्ट्री मिळाली असल्याचे म्हटले जाते. समृद्धी स्प्लिट्सव्हीला मध्ये दमदार कंटेस्टंट म्हणून नावारूपाला आली आता मराठी बिग बॉसच्या घरात ती स्वतःची ओळख कशी निर्माण करणार याची उत्सुकता आहे. इतर सदस्यांसोबत ती जुळवून घेणार की तिची अरेरावी बघायला मिळणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास १०० दिवसांच्या मराठी बिग बॉसच्या घरातील प्रवासासाठी समृद्धी जाधवला खूप खूप शुभेच्छा.