मराठी बिग बॉसच्या या आठवड्यात अनेक रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या. तेजस्विनी आणि प्रसादला एकत्र सरवाईव्ह करायचे होते त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे सूर जुळून आलेले दिसले तर अपूर्वा आणि विकासमध्ये थोड्या फार प्रमाणात बाचाबाची झाली. गेल्या आठवड्यात यशश्री मसुरकर सोबत किरण माने यांना घरातून बाहेर पडावे लागले. मात्र किरण माने यांना काही काळासाठी सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे घरातील सदस्य या गोष्टीपासून अनभिज्ञ दिसले. किरण मानेच्या अचानक एंट्रीने राणी मुंगी कोण याचा उलगडा सदस्यांना झाला. घरातील सदस्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी किरण माने यांनी सगळ्यांना नंबर दिले.
तेजस्विनीने पहिला क्रमांक पटकावला, तर अमृता धोंगडेला ७ क्रमांक दिल्याने ती किरण मानेवर खूपच चिडलेली दिसली. आपली मैत्रीण पहिल्या नंबरवर कशी जाते. आम्ही दोघीही चांगल्या खेळलो आहोत; मला तिच्या पुढचे तरी नंबर द्यायला हवे होते. डायरेक्ट सातव्या नंबरला का ठेवलं असे म्हणत तिने आपला राग व्यक्त केला. त्यानंतरही तेजस्विनी पहिल्या नंबरवर कशी म्हणून तिच्या सोबतदेखील वाद घातला. बिग बॉसच्या याच घडामोडींमुळे शोला चांगला टीआरपी मिळाला आहे. ह्या आठवड्यात व्हुट अँपवर मराठी बिग बॉस पाहणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसली. जिथे बिग बॉसच्या चौथ्या सिजनला दूर दूर पर्यंत टीआरपी मिळत नव्हता, तिथे ह्या आठवड्यात सदस्यांनी राडा घालून लोकांना आपल्या शोकडे आकर्षित केले.
बिग बॉसच्या घरात एक दोन नव्हे तर आता चक्क ४ सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी गोष्ट घडणार आहे. ह्या वाईल्डकार्ड एन्ट्री घेणाऱ्या सदस्यांची नावे काय आहेत याची उत्सुकता सगळ्यांना आहे. ह्यात दोन महिला आणि दोन पुरुष सदस्यांची नावे सुचवण्यात येत आहेत. मेघा धाडे हिने बिग बॉसचा पहिला सिजन जिंकला होता, तेव्हा ती वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेऊ शकते असे म्हटले जात आहे. दुसरे नाव सांगितले जात आहे डान्सर गौतमी पाटील, तर तिसरा सदस्य असेल मनिराज पवार आणि चौथा सदस्य असेल समीर परांजपे. अर्थात ही नावे सगळी चर्चेत असून त्यावर अजून शिक्कामोर्तब केलेला नाही. ही नावे संभाव्य असल्याने यातील कोणते सदस्य घरात येणार हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.