मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता ठरलेला शिव ठाकरे नुकताच भीषण अपघातातून थोडक्यात बचावला आहे. शिव ठाकरे त्याची बहीण, भाची आणि भाऊजीसोबत अमरावती हुन अचलपूरकडे जात होता. अमरावती हुन परतत असताना वळगावजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून टेम्पोने जोरदार धडक दिली होती. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोच्या धडकेमुळे शिव ठाकरे चालवत असलेली कार रस्त्याच्या कडेला शेतात घुसली.
सुदैवाने शिव ठाकरेने हातातले स्टेअरिंग सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला आणि गाडी कंट्रोलमध्ये आली. मात्र या अपघातात शिव ठाकरेच्या चेहऱ्यावर दुखापत झाली आहे शिवाय डोळ्याला देखील ईजा झाली आहे. या अपघातात शिव ठाकरेचे कुटुंब सुखरूप असले तरी त्याच्या बहिणीला डोक्याला मुका मार लागला असल्याचे सांगितले जाते. शिव ठाकरेची बहीण मनीषा ठाकरे हिने बिग बॉसच्या सीजन दोन मध्ये हजेरी लावली होती. बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे असल्याने त्याची आई आणि बहीण त्याला भेटायला आले होते त्यावेळी शिवची बहीण मनीषाने घरातील सदस्यांसोबत ओळख करून घेतली होती त्यानंतरही मनीषा बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत राहिली होती. एप्रिल महिन्यात मनीषाने गोंडस मुलीला जन्म दिला त्यावेळी मी मामा झालो असे म्हणत शिवने आपल्या भाचीचा म्हणजेच मनस्वीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मनस्वी आता अवघ्या सात महिन्यांची आहे. आपल्या लाडक्या बहिणीला आणि भाचीला घेऊन शिव ठाकरे अमरावतीला गेला होता.
तिथून परत येत असताना हा अपघात झाला. मात्र सुदैवाने किरकोळ जखमा वगळता या अपघातातून ते थोडक्यात बचावलेले असल्याचे समोर आले आहे. मात्र मागून टेम्पोची जोरदार धडक बसल्याने त्याच्या गाडीची मागची बाजू पूर्णपणे चक्काचूर झालेली दिसून येते. त्यामुळे टेम्पोची धडक किती जोरदार होती हे लक्षात येते. शिव ठाकरे झालेल्या दुखापतीतून लवकरच बरा होवो अशा सदिच्छा चाहत्यांकडून दिल्या जात आहेत.