स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत दुर्गा आत्याची एन्ट्री झाली आहे. दुर्गा आत्याच्या येण्यामुळे मालिकेला एक रंजक वळण मिळाले आहे. अल्लड अप्पू दुर्गा आत्याला पुन्हा तिच्या घरी पाठवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करते. मात्र अप्पूची ही खेळी दुर्गा आत्या तिच्यावरच पालटते. आता तर दुर्गा आत्याने तिच्या सगुणाची काळजी घेण्याचे चॅलेंज अप्पूला दिलं आहे. मात्र अप्पूने देखील हे चॅलेंज स्वीकारत दुर्गा आत्याला ड्रेस घालायला भाग पाडले आहे. दुर्गा आत्या आणि अप्पूची नोकझोक प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. दुर्गा आत्याची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी निभावली आहे.

शुभा खोटे या शाळेत असल्यापासूनच नाटकातून काम करत. नॅशनल लेव्हल सायकल चॅम्पियन असलेल्या शुभा खोटे यांनी विविधांगी भूमिका साकारत हिंदी, मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालेले होते हे विशेष. कारण शुभा खोटे यांचे वडील नंदू खोटे हे देखील चित्रपट नाट्य अभिनेते होते. तर त्यांच्या काकू दुर्गा खोटे या देखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तसेच शुभा खोटे यांचे भाऊ विजू खोटे हे देखील प्रसिद्ध अभिनेते होते. खोटे कुटुंबियांचा अभिनयाचा वारसा त्यांच्या तिसरी पिढीने देखील विढविला आहे. शुभा खोटे यांनी कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिनेश बलसावर यांच्याशी विवाह केला. भावना बलसावर आणि अश्विन बलसावर ही त्यांची दोन अपत्ये.

शुभा खोटे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलीने देखील अभिनय क्षेत्राची कास धरली. तर मुलगा अश्विनने साउंड रेकॉर्डिस्ट म्हणून चंदेरी दुनियेत पदार्पण केले. आपल्या मुलीसाठी दिनेश आणि शुभा खोटे यांनी चिमुकला पाहुणा या मराठी चित्रपटाची निर्मिती केली; त्याचे दिग्दर्शन स्वतः शुभा खोटे यांनी केले होते. या चित्रपटातून भावना बलसावर यांचे मराठी चित्रपट सृष्टीत आगमन झाले. सुखी संसाराची बारा सूत्रे, आमच्यासारखे आम्हीच चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. मात्र मराठी सृष्टीपेक्षा त्यांना हिंदी सृष्टीत विनोदी अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळाली. सहाय्यक, चरित्र भूमिकेपेक्षा त्यांनी विनोदी भूमिकांकडे आपले लक्ष्य केंद्रित केले. देख भाई देख या लोकप्रिय मालिकेने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.
त्यानंतरही अशाच धाटणीच्या भूमिका त्यांच्या वाट्याला येऊ लागल्या. तहकिकात, करमचंद, इधर उधर, दम दमा दम, हेरा फेरी, लाखों में एक, गुटूर गुं, सतरंगी ससुराल, हम सब बाराती, बेलन वाली बहु, गुडीया हमारी सभी पे भारी, स्पाय बहु अशा मालिकेतून पुढे त्यांनी विनोदी तसेच गंभीर सासूबाईंच्या भूमिका देखील साकारल्या. १२ वर्षांच्या डेट नंतर २०११ साली अभिनेते करण शाह सोबत भावना बलसावर यांनी लग्न केले. या दोघांनी नो प्रॉब्लेम, ओ डॅडी या मालिकेतून एकत्रित काम केले होते. करण शाह हे दिग्दर्शक आणि मॉडेल म्हणूनही प्रसिद्धी मिळवताना दिसले होते.