केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांची कॉलेजमधील नाटकांमधून मैत्री झाली. ऑल द बेस्ट हे त्यांचं नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. सही रे सही, मोरूची मावशी, श्रीमंत दामोदरपंत अशा अनेक नाटकांतून भरतच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. पुढे लक्ष्मी चित्रपटात अंकुश आणि भरत यांची केमिस्ट्री या प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळाली. अफलातून अभिनयाच्या जोरावर मराठी सृष्टीतील मानधन वाढवून घेणारा पहिला अभिनेता म्हणून भरतची ओळख अबाधित आहे. पुन्हा सही रे सही गेली दोन दशके सर्वांना आनंद देत आलंय, यावर्षी पुण्यात पुन्हा दणक्यात प्रयोग सादर करण्यात आले. कलेचं माहेरघर असलेल्या पुणेकरांनी जबाबदारीने प्रयोगाला येऊन मनमुराद हसण्याचा आनंद घेतला.
आज भरत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केदार यांनी पुन्हा कॉलेजपासूनच्या मैत्रीची आठवण काढली आहे. It’s long association, किती वर्ष आपल्या तिघांची मैत्री आहे हे आठवतही नाही. पण आपण आपलेच उत्तम टिकाकार आहोत. आमच्या दोघात भरत तू मोठा. पण, मला आणि अंकुशला याची कधी जाणीवही तू करून देत नाहीस. पण एक मात्र नक्की आम्हा दोघांपेक्षा वयानेच नाही तर कतृत्वानेही तू खुप मोठा आहेस. तरुणपणी पाहिलेल्या स्वप्नांच्या नजरेतूनच आपण आयुष्याची वाटचाल करत असतो. आयुष्याच्या त्या वळणावर योग्य माणसं आपल्याला लाभली तर त्याहून उत्तम गोष्ट कुठलीच नसते. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा आणि आता भेटूया खुप वेळ एकत्र घालवूया! नवं सही काही तेव्हाच निर्माण होईल, श्री स्वामी समर्थ.
ऑल द बेस्ट मधील आठवणीत ते म्हणतात, अंकुशला इतर कामानिमित्त नाटकाच्या प्रयोगाला येणे शक्य नव्हते तेव्हा काळा चष्मा लावून तब्ब्ल ७५० प्रयोगात आंधळ्यांची भूमिका त्यांनी केली होती. नाटकांमधील भरतच्या जुन्या आठवणींना केदार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी उजाळा दिला. १९९८ श्रीमंत दामोदरपंत या नाटकाने खुप स्थीत्यंतरं दाखवली. नाटक आलं तेव्हा लोकांना बोलावून गर्दी करावी लागत होती. आता गर्दीतल्या मनामनात हे नाटक घर करून बसलय. लक्ष्मीकांत बेर्डे यांचासाठी नवं काही तरी लिहावं म्हणून मी आणि भरत चर्चेला बसलो आणि कधी हे नाटक भरतचं झालं तेच समजलं नाही. या संपुर्ण प्रवासात त्याच्या सोबत त्याच तडफेने काम करणारे कलाकार आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ यांचं प्रेम अजूनही जादूई नाटकावर तेवढच आहे आणि राहील.
हे नाटक कधी बंद होऊ नये, पण जेव्हा हे थांबेल त्याला कारणीभूत भरतच असेल. तो जोवर तडफेने काम करतोय तोवर हे नाटक सुरू राहील. त्याला कंटाळा येईल तेव्हा हे थांबेल! पण मला वाटत नाही की, अजून १९ वर्षाने ही वेळ येईल! श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अशी कलाकृती माझ्या हातून घडली. पण यात माझ्या पाठीमागे असणारे स्वामी होतेच. पण त्या सोबत अजून एक व्यक्ती होती, माझा मित्र अंकुश चौधरी. मी, भरत आणि अंकुश या तिघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब म्हणजे “सही”.