उभा धन्य बाजी प्रभू देशकाजी, पुढे शूर छाती मनी थोर निष्ठा. जरी शत्रुचे येत दुर्दम्य वाजी, तरी तत्त्वनिष्ठा न त्याची प्रतिष्ठा. तया कोठला? मृत्यु मृत्युस मात्र, संजीवनी मंत्र स्वातंत्र्य स्वातंत्र्य! सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात आषाढ पौर्णिमेच्या काळ रात्री हर हर महादेव चा एकच गजर झाला. राकट मराठ्यांच्या स्वामिनिष्ठेपुढे गनिम हतबुद्ध झाला. घोडखिंडीत बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या रक्तानं इतिहासाचं विजयी पराक्रमी पान कायमचं कोरलं गेलं. पावनखिंडचा मराठेशाहीतील हा रक्तरंजित आणि थरारक अध्याय, अजोड पराक्रमाची हि यशोगाथा जनसामान्यांना कायम प्रेरणा देत आली आहे. बाजीप्रभू आणि बांदल सेनेचा अतुलनीय पराक्रम आलमंड क्रिएशनच्या “पावनखिंड” या अद्वितीय कलाकृती द्वारे पुढील महिन्यात २१ जानेवारीला पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे.

स्वराज्याच्या स्वप्नासाठी उभा जन्म आणि छत्रपती शिवरायांसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या बलिदानाची गाथा सांगणारा पावनखिंड चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. अविस्मरणीय कालखंडाच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी रसिक प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. फर्जंद चित्रपटात शूरवीर कोंडाजी फर्जंद यांनी कमीत कमी सैन्यानिशी पन्हाळा काबीज करण्याची जिगरबाज कथा मांडली गेली. तर फत्तेशिकस्त च्या माध्यमातून लाल महालातील युद्धनीतीचा रोमांचक थरार प्रेक्षकांना अनुभवता आला. लेखक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, निर्माते भाऊसाहेब आरेकर, अजय आरेकर,अनिरुद्ध आरेकर यांनी अथक परिश्रमाने आगामी चित्रपट पावनखिंड मध्ये पराक्रमाची पराकाष्ठा करणारे बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेना यांची यशोगाथा प्रेक्षकांसमोर यावेळी मांडली आहे.

स्वराज्य साकार होत असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराने स्वराज्यासाठी स्वतःचा जीव कवडीमोल मानला. त्या सर्व ज्ञात अज्ञात असंख्य मावळ्यांच्या माघारी, प्रत्येक घरातली माता भगिनी एक एक क्षण स्वराज्यासाठी लढत होती, स्वतःबरोबर, दैवाबरोबर आणि वेळ पडलीच तर रणमैदानावर. आणि त्या प्रत्येकीचा आदर्श होत्या राजमाता जिजाऊ आईसाहेब. चित्रपटात जिजाऊ आऊसाहेब यांच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, तर रुची सवर्ण मोहन मातोश्री सोयराबाई राणीसरकार, जेष्ठ अभिनेत्री उज्ज्वला जोग मातोश्री बयोबाई देशपांडे, दीप्ती केतकर श्रीमंत दीपाईआऊ बांदल. तसेच माधवी निमकर मातोश्री गौतमाई देशपांडे, प्राजक्ता माळी श्रीमंत भवानीबाई बांदल, सुरभी भावे मातोश्री सोनाई देशपांडे यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

या सर्व रणरागिणी मातांना समर्पित असा पावनखिंड चा टीजर ‘स्वराज्याच्या वीरांगना! धन्य त्या माता, धन्य ते स्वराज्य’ प्रेक्षकांच्या चर्चेस पात्र ठरला आहे. छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर असून सोबत अंकित मोहन देखील असणार आहे. या अगोदर लोकसंगीतातील लोकप्रिय प्रकार भारुडावर आधारित पावनखिंड मधील पहिलं गाणं युगत मांडली ने प्रेक्षकांना ठेका धरायला लावला होता. ऐतिहासिक दोन चित्रपटांच्या यशस्वी वाटचालीच्या दांडग्या अनुभवावर लेखक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर रसिक प्रेक्षकांसाठी अपरिचित अनमोल खजिना उलगडणार आहेत. पावनखिंडच्या संपूर्ण टीमला चित्रपटाच्या घवघवीत यशासाठी खूप खूप शुभेच्छा.
