बाहुबली चित्रपटाचा डंका जगभर गाजला, अप्रतिम कथानक आणि आधुनिक ग्राफिक्सच्या माध्यमातून दिग्दर्शन एस एस राजामौली यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, रम्या कृष्णन, नासर, सत्यराज आणि सुब्बाराजू या दिग्गज कलाकारांनी कमालीचा अभिनय करीत चित्रपटाला मोठे यश प्राप्त करून दिले. बाहुबलीची बॉक्स ऑफिस कमाई तब्बल २००० कोटींचा टप्पा पार करून गेली, या शिवाय जगभर प्रदर्शित झाल्यानंतरची कमाई तब्ब्ल ८ बिलियन एवढी होती.

बाहुबलीच्या विविध भाषांतील अभूतपूर्व यशानंतर मराठी रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपट दिवाळीच्या शूभ मुहूर्तावर मराठी भाषेत येत आहे. मराठीतील आपल्या आवडत्या कलाकारांचे आवाज डबिंग करून झालेले आहेत, यात प्रामुख्याने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार यांची वर्णी लागली आहे. कौशल इनामदार यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हंसिका अय्यर, बेला शेंडे आणि केतकी माटेगावकर यांना संधी मिळाली आहे. प्रेस रिलीज मधील नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचा लाडका अवधूत गुप्ते अनोख्या अंदाजात पाहायला मिळाला.या प्रसंगी सर्व कलाकार आणि गायक यांच्यासह अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे देखील उपस्थित होते. गाजलेल्या कलाकृतीला मराठी मातीचा सुगंध लाभणार आहे हे मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट ठरणार आहे. आतापर्यंत आपण बाहुबलीचं वैभव पाहिलंय आता ते आपल्यास ऐकायला मिळेल, असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या प्रसंगी सांगितले.

चित्रपटासाठी गायनाची संधी मिळाल्याने अभिनेत्री गायिका केतकीने प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणते, “भारतीय चित्रपट उद्योगाच्या बाहुबली सारख्या सर्वात प्रसिद्ध आणि महान चित्रपटांसाठी गीते मराठीमधून गायल्याबद्दल अत्यंत सन्मानित झाले आहे. आपल्या भाषेत एम एम करीम सरांनी संगीतबद्ध केलेले अप्रतिम गायक हृषीकेश रानडे सोबत हे गाणे गायले आहे आणि मिलिंद जोशी यांचे मराठीतील अप्रतिम गीत आहे. या विश्वासाबद्दल प्रवीण तरडे आणि कौशल इनामदार यांचे मनःपूर्वक आभार! मी पंचप्राणतला गंधा, पंछी बोले या गाण्याची मराठी आवृत्ती गायली आहे.” मराठी बाणा वाहिनीवर मराठीत बाहुबली नक्की पाहण्याचे तिने रसिकांना आवाहन केले आहे. आपला मराठमोळा बाणा जपत डोळे दिपवून टाकणाऱ्या बाहुबलीच्या भव्यतेचे प्रत्येकाला घरबसल्या दाखवण्याचा शेमारू मराठीबाणा वाहिनीचा प्रयत्न प्रेक्षकांसाठी नक्कीच अनमोल भेट ठरणार आहे.