महेश कोठारे दिग्दर्शित पछाडलेला हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. पाच अक्षरी चित्रपटांच्या यादीतला हा यशस्वी चित्रपट म्हणून गणला जातो. फक्त ७५ लाखांचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्ब्ल ७ कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. इनामदारांच्या वाड्यातला बाब्या ‘बाबा लगीन’ म्हणत मनीषा सोबत लग्न करायला धडपडत असतो. मात्र भरत, रवी आणि समीर हे तिघे मित्र मनिषाला या संकटातून कसे सुखरूप बाहेर काढतात याचे कथानक चित्रपटात पाहायला मिळाले. बाबा लगीन हा बाब्याचा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहीला आहे. याचे श्रेय जाते हे पात्र साकारणाऱ्या कलाकाराला म्हणजेच अमेय हुनसवाडकर याला.
अमेय हा मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिका अभिनेता आहे. लहान मोठ्या भूमिका साकारत असतानाच बाब्याच्या भूमिकेने त्याच्या करिअरला मोठे वळण मिळाले. विनोदाचे टायमिंग आणि अभिनयाची सांगड घालत तो हिंदी चित्रपटात देखील चमकू लागला. नायक, तुझे मेरी कसम, प्लॅन, रॉकी अँड अकसर, बॉम्बे टू बँकॉक, व्हिक्टोरिया नं २०३, अजब प्रेम की गजब कहानी अशा बॉलिवूड चित्रपटातून त्याच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळत गेला. पछाडलेला चित्रपटानंतर खबरदारमध्ये तो पत्रकाराच्या भूमिकेत दिसला. फूल 3 धमाल, चतुर नवरा चिकनी बायको, बाबा लगीन, माझी माणसं हे त्याने अभिनित केलेले काही मराठी चित्रपट. अमेय गेल्या काही वर्षांपासून जाहिरात क्षेत्रातही नाव कमावताना दिसत आहे.
अमेय चर्चेत येण्याचे कारण म्हणजे लवकरच तो एका बॉलिवूड चित्रपटातून महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अमेयला बॉलिवूड चित्रपटातून मोठमोठाल्या सेलिब्रिटींसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. छत्रीवाली या आगामी बॉलिवूड चित्रपटात तो रकुल प्रीत सिंग आणि सतीश कौशिक यांच्यासोबत दिसणार आहे. तेजस देवस्कर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. हा चित्रपट एका कंडोम फॅक्टरीत काम करणाऱ्या सर्वसामान्य मुलीच्या जीवनावर आधारित असणार आहे. चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले असून हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे अमेय आपल्या या आगामी बॉलिवूड चित्रपटासाठी खूपच उत्सुक झाला आहे. या आणखी एका बॉलिवूड चित्रपटासाठी अमेय हुनसवाडकरचे अभिनंदन आणि चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.