२८ जून १९९१ रोजी रणधीर कपूर दिग्दर्शित “हिना” हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला होता. ऋषी कपूर, अश्विनी भावे आणि झेबा बख्तियार यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही आठवण म्हणून नुकतेच अश्विनी भावे हिने तिच्यावर चित्रित झालेलं ‘आजावे माही’ हे गाणं शेअर केलेलं पाहायला मिळतं आहे. अश्विनी भावे या ऋषी कपूरच्या खूप मोठ्या फॅन आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद त्यांनी व्यक्त केला होता. या चित्रपटाची नायिका म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियार हिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
झेबा बख्तियार हिने १९८८ साली अनारकली या पाकिस्तानी मालिकेतून प्रसिद्धी मिळवली होती. या मालिकेनंतर तिला हिना चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. हिना चित्रपटातून भरघोस यश मिळाल्यानंतर झेबाकडे काही मोजके चित्रपट आले. पण यात तिला म्हणावे तसे यश न मिळाल्याने तिने पाकिस्तानी टीव्ही मालिका आणि चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली. झेबाने तिच्या आयुष्यात तब्बल चार वेळा लग्न केली. पण ही चारही लग्न टिकली नसल्याने आज ती आपल्या मुलासोबत सिंगल मदर म्हणून आयुष्य जगताना दिसते. अशावेळी एक अभिनेत्री म्हणूनही ती पाकिस्तानी मालिकेतून तसेच चित्रपटातून काम करते आहे. चित्रपटात येण्याअगोदर १९८२ साली झेबा बख्तियारने क्वेटा येथील सलमान गलियानीसोबत पहिले लग्न केले होते. या जोडप्याला एक मुलगी सुद्धा झाली.
परंतु त्यांचे लग्न संपुष्टात आल्यानंतर ते वेगळे झाले आणि परिणामी बख्तियारच्या बहिणीने त्यांची मुलगी दत्तक घेतली. १९८९ मध्ये, तिने भारतीय अभिनेता जावेद जाफरीशी लग्न केले. पण हे लग्नही न टिकल्याने त्यांनी लग्नाच्या एका वर्षाच्या आतच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. हिना चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर पाकिस्तानी गायक अदनान सामी झेबाच्या प्रेमात पडला. तो झेबापेक्षा तब्बल नऊ वर्षाने लहान होता, मात्र तरीदेखील झेबाने अदनान सामीसोबत तिसरे लग्न केले. परंतु पाच वर्षांनंतर ते वेगळे झाले. अजान सामी खान हा त्यांचा एकुलता एक मुलगा. घटस्फोट झाल्यानंतर दोघांनी मूल आपल्याकडे राहावे म्हणून वाद घातला. शेवटी अजान झेबाकडे राहिल असा कोर्टाने निर्णय दिला. २००८ साली झेबाने सोहेल खान लघेरी सोबत चौथे लग्न केले पण हे लग्नही संपुष्टात आले.