झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात झी मराठीवर एक दोन नव्हे तर तब्बल चार नव्या मालिका दाखल होत आहेत. या सोबतच आता झी मराठी वाहिनीवर आणखी एक नवी मालिका दाखल होणार आहे. या नव्या मालिकेच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असून श्वेता शिंदेने आपल्या या मालिकेचे नाव जाहीर केलेले पाहायला मिळत आहे. वज्र प्रॉडक्शन निर्मित ‘आप्पी आमची कलेक्टर’ ही नवी मालिका झी मराठी वाहिनीवर दाखल होत आहे. आज या मालिकेचा मुहूर्त करण्यात आला असून या मालिकेची झलक लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
लागीरं झालं जी, मिसेस मुख्यमंत्री या मालिकेनंतर श्वेता शिंदे आणि झी मराठीचे एक अतूट नातं निर्माण झालं आहे. लागीरं झालं जी या मालिकेला ग्रामीण भाषेचा बाज पाहायला मिळाला. शहरी भागातील प्रेक्षकां प्रमाणे ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी देखील या मालिकेला डोक्यावर उचलून घेतले होते. मालिकेच्या यशानंतर श्वेता शिंदे हिने मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. त्याला देखील प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. आता अशाच धाटणीची ‘आप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका असणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. श्वेता शिंदे हिने आपल्या आगामी मालिकेचे नाव जाहीर केले असले तरी यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.
येत्या काही दिवसातच या कलाकारांच्या नावाचा उलगडा होईल मात्र त्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार, बँड बाजा वरात, मन उडू उडू झालं आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चार मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहेत. या मालिकेच्या जागी बस बाई बस, डान्स महाराष्ट्र डान्स, तू चाल पुढं, नवा गडी नवं राज्य या नव्या मालिका आणि रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या काही दिवसात झी मराठीची पाचवी मालिका निरोप घेत आहे मात्र ही मालिका कोणती असणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
सत्यवान सावित्री ही मालिका काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर दाखल झाली होती. मात्र या मालिकेला प्रेक्षकांचा अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. त्याचमुळे येत्या काही दिवसात सत्यवान सावित्री ही मालिका निरोप घेईल असे बोलले जात आहे. याबाबत प्रेक्षकांना लवकरच स्पष्टीकरण मिळेल. पुढील काही दिवसात झी मराठीवर तब्बल चार नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहेत. तूर्तास श्वेता शिंदेची नवी मालिका दाखल होत असल्याने झी मराठीचे प्रेक्षक खुश झाले आहेत.