स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेने एक वर्षाचा लीप घेतला आहे. त्यामुळे या मालिकेला एक धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोमध्ये अंकुश आणि अबोलीच्या नात्यात दुरावा आलेला पाहायला मिळाला. अर्थात अंकुशची स्मृती गेल्याने त्याला पूर्वायुष्यातील काहीच गोष्टी आठवत नसतात. त्याला अबोलीचे नाव माहीत असते पण तो पल्लविला अबोली समजून तिच्यासोबत संसार थाटताना पाहायला मिळाला आहे. अंकुशची स्मृती जावी म्हणून पल्लवी त्याला गोळ्या खाऊ घालते पण तरीही अंकुशच्या तोंडात अबोलीचे नाव कायम आहे.
अंकुश अबोलीला पुन्हा कसे मिळवणार याची रंजक कहाणी मालिकेत पाहायला मिळणार आहे. मात्र जीव माझा गुंतला या मालिकेच्या कथानकाशी हा ट्विस्ट अगदी मिळताजुळता झालेला आहे. मल्हारलाही अशाच गोळ्या खाऊ घालण्यात आल्या आहेत त्यामुळे तो त्याची स्मृती गमावतो, सोबतच तो अंतरालाही विसरतो. या मालिकेसोबत भाग्य दिले तू मला या मालिकेतही कावेरी तिची स्मृती गमावताना दिसत आहे. तूर्तास अबोली मालिकेत एन्ट्री करणाऱ्या पल्लवीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. अबोली मालिकेत पल्लवीची भूमिका अभिनेत्री अनुजा चौधरी हिने साकारली आहे. अनुजा ही वकील आहे पण तिला अभिनयाची आवड असल्याने याच क्षेत्रात करीअर करण्याचा निर्णय तिने घेतला आहे. अनुजा ही हिंदी मराठी मालिका अभिनेत्री आहे.
स्टार प्रवाहवरील जय देवा श्री गणेशा या मालिकेत तिने लक्ष्मीमातेची भूमिका साकारली होती. कुसुम ही तिने अभिनित केलेली आणखी एक मालिका. हळुवार पाऊले या गाण्यात ती प्रमुख भूमिकेत झळकली होती. अनुजाला मंडला आर्टची विशेष आवड आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो म्हणून तिने समुपदेशनाचे प्रशिक्षण घेतले आहे. अनुजा एक मदतीचा हात म्हणून फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाऊन अंध मुलांचे परीक्षेचे पेपर लिहिण्याचे काम करते. यातून ती सामाजिक बांधिलकी जपताना दिसते. एक वकील, चित्रकार, समुपदेशक आणि अभिनेत्री असण्याची जबाबदारी ती चोख बजावत आहे. अबोली मालिकेत तिची विरोधी भूमिका आहे, त्यामुळे अनुजाला प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागणार आहे. अर्थात ही तिच्या सजग अभिनयाची एक पावतीच म्हणावी लागेल.