कलर्स मराठी वाहिनीवर जय जय स्वामी समर्थ ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेतील स्वामी समर्थांची भूमिका अभिनेता अक्षय मुडावदकर यांनी निभावली असून चांदूले, कृष्णाप्पा, येसू, चोळप्पा, कालिंदि, दाजीबा सरकार या भूमिका तितक्याच भाव खाऊन जाताना दिसतात. या मालिकेतील अभिनेता आनंद प्रभू नुकताच बाप झाला असल्याची बातमी समोर येत आहे. जय जय स्वामी समर्थ या मालिकेत आनंद प्रभूने दाजीबा सरकारची भूमिका बजावली आहे. दाजीबा सरकार हा स्वामी समर्थाना आणि गवकऱ्यांना कसा त्रास देतो हे दाखवले आहे. ही भूमिका विरोधी जरी असली तरी त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झालेले पाहायला मिळते.
आनंदने या मालिके अगोदर बापमाणुस या मालिकेतून अभिनय साकारला होता. सुरुवातीला अनेक नाटकांमधून त्याने महत्वाच्या भूमिका देखील साकारलेल्या पाहायला मिळाल्या. आनंद प्रभू हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातला. महाविद्यालयिन शिक्षण घेतल्यावर मुंबईत येऊन त्याने अभिनयाचे धडे गिरवले होते. इथूनच त्याची रंगभूमीशी नाळ जोडली गेली. अनेक नाट्यस्पर्धांमध्ये आणि एकांकिकेतून त्याने अभिनय साकारला असून मालिकेतून देखील तो पाहायला मिळाला.
आनंद प्रभू हा नेत्रा केतकरसोबत विवाहबद्ध झाला. काल १ सप्टेंबर बुधवारी त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. ही आनंदाची बातमी स्वतः आनंदने सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या बातमीने अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आनंद प्रभूची पत्नी नेत्रा ही नृत्य कलेत निपुण आहे. आजवर तिने नृत्याची अनेक कार्यक्रम सादर केली आहेत. पुत्ररत्न प्राप्तीबद्दल आनंद आणि नेत्रा दोघांचेही खूप खूप अभिनंदन…