प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचून आणलेली पाहायला मिळाली. प्रत्यक्षात दिघे साहेब कसे होते हे प्रवीण तरडे जाणून होते त्यामुळे त्यांचा परिचय चित्रपटातून व्हावा अशी त्यांची मनापासून ईच्छा होती. चित्रपटाचे शूटिंग रात्रंदिवस चालू होते तरीही चित्रपटातील कलाकार तितक्याच उत्स्फूर्तपणे ते काम पूर्ण करत होते. या चित्रपटाच्या शुटिंगवेळी अनेक चांगले अनुभव या कलाकारांना आले. दिघे साहेब जाऊन २१ वर्षे लोटली मात्र त्यांच्यावरील प्रेम आजही लोकांमध्ये पाहायला मिळाले. ही मंडळी दिघे साहेबांवर चित्रपट बनतोय हे समजताच सेटवर चहा बिस्किटं घेऊन कलाकारांचे कौतुक करायला येत असत.
हे अनुभव चित्रपटातल्या कलाकारांना भारावून सोडणारे होते. आनंद दिघे साहेबांचा जीवनप्रवास नेमका कसा होता त्यांचं कार्य कसं होतं हे कळावं म्हणून हा चित्रपट तयार करण्यात आला असे प्रवीण तरडे म्हणतो. नुकतेच धर्मवीर चित्रपटाच्या प्रीमियर शोला एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकला बाईकवर मागे बसवून नेले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे आनंद दिघे साहेबांना असेच बाईकवर मागे बसवून चित्रपट पाहायला जायचे ही आठवण त्यांना पुन्हा एकदा प्रसाद ओकमुळे अनुभवता आली. प्रसाद ओकने आपल्या अभिनयाने आणि गेटपमुळे दिघे साहेब प्रत्यक्षात उतरवले आहेत अशीच एक भावना व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे प्रसाद ओकचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. धर्मवीर चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी खेचून आणली होती. शुक्रवारी बॉक्सऑफीसवर या चित्रपटाने २.०५ कोटींचा गल्ला जमवलेला पाहायला मिळाला. शनिवारी आणि रविवारी चित्रपट चांगला गल्ला जमवतात हा आजवरचा अनुभव आहे. या चित्रपटाच्याही बाबत असेच घडलेले पाहायला मिळाले. शनिवारी दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २.४९ कोटींचा गल्ला जमवलेला पाहायला मिळाला. तर आज रविवारी देखील हा चित्रपट ३ कोटींचा गल्ला जमवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अवघ्या ३ दिवसातच या चित्रपटाने ९.५९ कोटींपर्यंत मजल मारणार असे वर्तवण्यात येत आहे.
धर्मवीर चित्रपट बनवण्यासाठी जवळपास १० कोटींचा खर्च झाला असे सांगितले जाते. यात चित्रपटाच्या प्रमोशनचा खर्च देखील गृहीत धरलेला आहे. त्यामुळे १० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट तिकीट बारीवर चांगली कमाई करणार असा विश्वास वाटतो. एकीकडे हिंदी चित्रपटामुळे मराठी चित्रपट चालत नाहीत असे बोलले जाते. मात्र धर्मवीर चित्रपटाने जयेशभाई जोरदार चित्रपटाला चांगली टक्कर दिली आहे. रणवीर सिंहचा मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल फेल ठरला आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपट सरस ठरलेले पाहून बॉलिवूड सृष्टी धास्तावलेली पाहायला मिळत आहे.