कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. ऑगस्ट २०१८ साली सुरू झालेल्या या मालिकेतून बाळू मामांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. गेल्या ३ वर्षांहुन अधिक काळापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत सखूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. मालिकेत सखूची भूमिका अमृता उत्तरवार हिने निभावली आहे. अमृता मूळची पुसदची, कॉलेजमध्ये असल्यापासून तीला अभिनयाची ओढ लागली. अमरावती युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यानंतर अमृताने काही काळ नोकरी देखील केली.
पण नोकरीत फारसे मन रमेना म्हणून मग हौशी नाटक, प्रायोगिक नाटक साकारत असतानाच तिची पाऊले मुंबईच्या दिशेने वळवली. युगप्रवर्तक सावित्रीबाई फुले या नाटकातून तिला मुख्य भूमिका मिळाली. मनोधैर्य या चित्रपटात तिने किशोरी शहाणे सोबत मुख्य नायिकेची भूमिका देखील साकारली. अल्पावधीतच या पुसदच्या कन्येने तब्बल दहा चित्रपट आणि तीन नाटकांमधून काम करून आपले नाव यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. साऊ माझी सौभाग्याची, त्या चार योनींची गोष्ट, आयुष्य, घेतला वसा टाकू नको, झिप्रु. नकळत सारे घडले, श्री गुरुदेव दत्त, who is she अशा चित्रपट, नाटक, शॉर्टफिल्म आणि मालिकांमधून अमृताने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या.
मराठी सृष्टीत स्थिरस्थावर होत असतानाच तिने आपल्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर जाहीर केली. अमृताने नुकतेच विशाल बोनगिरवार यांच्या सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला आहे. ‘या दिवसापासून पुढे आपण कधीही एकटे नसू.’ असे कॅप्शन देऊन तिने साखरपुड्याचा खास फोटो शेअर केला आहे. तिच्या या बातमीवर तिच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो. मराठी सृष्टीत आता अनेक कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे त्यात अमृताच्या साखरपुड्याची चर्चा पाहायला मिळते आहे. आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी अमृता उत्तरवार हिचे खूप खूप अभिनंदन.