अशक्य ही शक्य करतील स्वामी, स्वामींच्या लीला अगाध आहेत. मराठी सृष्टीतही कलाकार मंडळींची स्वामींवर अपार श्रद्धा आहे. स्वामींनी आपल्याला संकटातून बाहेर काढलं आणि योग्य मार्ग दाखवला याची प्रचिती अनेकांना आलेली आहे. नुकतेच अभिज्ञा भावे हिने तिच्या घरी बाप्पाचे स्वागत केले. पती मेहुलच्या संकट काळात स्वामींनी त्याला बाहेर काढलं म्हणून अभिज्ञाने तिच्या घरच्या बाप्पाला स्वामींचे रूप दिले आहे. तर अभिनेत्री मानसी नाईक हीची देखील स्वामींवर नितांत श्रद्धा आहे.
तर नुकतेच अमृता खानविलकर हिने आपल्या पडत्या काळात स्वामींनी साथ दिली असे म्हटले आहे. अमृताचा अनुभव खूप वेगळा आहे या गोष्टी व्यक्त करू शकत नाही. मात्र आलेल्या अनुभवाबद्दल ती सांगते की, ज्यांना आयुष्यात खूप चमत्कार बघायचे असतात ते स्वामींचरणी जातात, ते तुम्हाला बोलावून घेतात. तुम्ही फक्त त्यांचा जप करा. त्यांचं असं काहीच नाहीये की त्यांच्यासाठी खूप मोठी पूजा घाला किंवा त्यांच्यासाठी खूप काही करा. तुम्ही जितकं मनाने त्यांचं कराल ते खूप आहे, माझ्या पडत्या आणि अवघड काळात स्वामींनी मला बोलावून घेतलं असे म्हणेन. मी अगोदर जिथे राहायला होते तिथे कोपऱ्यावरच स्वामी समर्थांचा मठ होता आणि मी अनेक वर्षे दररोज त्या मठात जात होते.
स्वामी महाराजांची जी शक्ती आहे ती फार विलक्षण आहे. ती फक्त तुम्ही अनुभवू शकता. मी हा अनुभव सांगू नाही शकत, माझ्याबरोबर काय काय झालं आणि कुठल्या कुठल्या गोष्टींमधून त्यांनी मला बाहेर काढलंय. त्यांची जी ताकद आहे त्याची फक्त तुम्ही अनुभूती घेऊ शकता. दिग्दर्शक केदार शिंदे हे देखील स्वामींचे निस्सीम भक्त आहेत. प्रवीण तरडे यांनाही स्वामींचा महिमा कळला आहे. देऊळ बंद चित्रपटावेळी स्वामी समर्थ कोण हेच त्यांना माहीत नव्हते. मात्र चित्रपटाचे कथानक सुचत गेले तसा चित्रपट बनत गेला आणि या चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली. हे सगळं स्वामींमुळेच घडू शकलं असे प्रवीण तरडे यांचे स्पष्ट मत आहे.