झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोच्या दोन्ही सिजनमध्ये मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांना आमंत्रित करण्यात येत होते. त्यामुळे तिसऱ्या सिजनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तिसरा सिजन सुरू झाला तेव्हा सुरुवातीच्या काही एपिसोडमध्ये राजकारण्यांना पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. आरोप प्रत्यारोप तर बातम्यांमध्ये बघतो मग आता या शोमध्येही तेच पहायचे का? अशी ओरड सुरू झाली. पण कालांतराने या शोला प्रेक्षकांकडून मोठी प्रसिद्धी मिळत गेली. अगदी राज ठाकरे, उर्मिला मातोंडकर, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून आता अमोल कोल्हे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. अमोल कोल्हे हे राजकारण आणि अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा करत होते. पण ओघानेच त्यांची पाऊलं ग्लॅमरस दुनियेकडे वळली आणि त्यांनी अभिनय क्षेत्रासोबतच राजकारणात सुद्धा जम बसवला. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर कलाकृती घडवल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचा आढावा घेणारी कलाकृती घडवताना त्यांना खूप वाईट अनुभव आला. खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर त्यांनी याबाबत नुकताच एक धक्कादायक खुलासा केलेला पाहायला मिळतो आहे. “छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एक कलाकृती करायची होती.
अवधुतजी एका तत्कालीन खासदाराने जे आज माजी खासदार आहेत त्यांच्याकडे मी फायनान्ससाठी प्रपोजल घेऊन गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला उत्तर दिलं होतं की, जर प्रोजेक्ट फसला आणि याला प्रॉपर्टी सहित विकला तरी पैसे नाही देणार. तेव्हाचे ते सगळे चेहरे डोळ्यासमोर आहेत की जी जी दारं मी ठोठावून आलो होतो. जेव्हा ते चेहरे पुन्हा ते बोलतात महाजांचं नाव आणि संभाजी महाराजांचं नाव घेतात तेव्हा कुठेतरी असं वाटतं नहीं बॉस जीस दिन बोलूंगा ना.” आता या मुलाखतीत अमोल कोल्हे यांनी त्या खासदारांचे नाव उघड केले नसले तरी अवधूत गुप्ते त्या नावाचा उलगडा करणार का याची जास्त उत्सुकता आहे. त्यामुळे येत्या रविवारचा भाग रंजक ठरणार असल्याचे दिसून येते.