स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत लवकरच एक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत नुकतेच मोरे कुटुंबात ओंकारसोबत लग्न करून पुजाचा गृहप्रवेश झाला आहे. मात्र अवनीचे पूजासोबत पटत नसल्याने अवनी तिच्यापासून थोडीशी लांब राहताना दिसते. मालिकेत नुकतेच सरूच्या बाळाचे बारसे झाले त्यावेळी अंजी आई कधी होणार यावर बायकांची कुजबुज सुरू झालेली असते. बायकांनी मारलेले हे टोमणे पश्याला मात्र अजिबात सहन होत नाहीत. एखाद्या बाईला मूल होत नाही म्हणून तिचं आयुष्य संपलं का? या विषयावर मालिकेत चर्चा झालेली दिसली.
माझ्यामुळेच अंजी आजवर आई होऊ शकली नाही असे उत्तर देऊन पश्या या बायकांना गप्प करताना पाहायला मिळाला. अंजी आई न होण्याला मी जबाबदार आहे, आम्ही आताशी कुठे एकमेकांचे चांगले मित्र बनलो आहोत. लवकरच आमच्यात प्रेमही जुळेल असे म्हणत तो अंजीबद्दल खुलासा करताना म्हणतो. मालिकेत लवकरच एक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जोगतिणीने एक भाकीत वर्तवले आहे. घराचा पाया ढासळणार असे वक्त्यव्य तिने केलेले आहे. त्यामुळे मालिकेत नेमके काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. मालिकेतील वैभवचे पात्र साकारणाऱ्या अमेय बर्वे याने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. अमेय लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे बोलले जात आहे.
मोरे कुटुंबाच्या घराचा पाया ढासळणार या जोगतिणीच्या म्हणण्यानुसार ट्विस्ट येणार आहे. म्हणजेच मालिकेतील वैभव बद्दल काहीतरी वाईट घडणार असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच अमेयने आपले काम आटोपून या मालिकेचा निरोप घेतला आहे. अमेयच्या वाढदिवसाच्या दिवशी अवनी म्हणजेच अभिनेत्री साक्षी गांधीने शुभेच्छा दिल्या होत्या. त्यात तिने अमेयला मिस करत असल्याचे म्हटले होते. अमेयने ही मालिका का सोडली याचे कारण अजून तरी त्याने दिलेले नाही. मात्र तो एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशी चर्चा आहे. वैभवच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवले होते, त्यामुळे तो ही मालिका सोडतोय हे कळल्यावर चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. मात्र त्याच्या येणाऱ्या नव्या मालिकेबद्दल तेवढीच उत्सुकता आहे.