बिग बॉस मराठी चौथा सीझन आणि वाद हे समीकरण आता रोजचंच झालंय. शोमध्ये स्पर्धक सदस्यांना देण्यात येणाऱ्या टास्कमध्ये टीम ए आणि बी आमनेसामने भिडत असतात. अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर यांच्यामध्येही नुकताच टोकाचा वाद झाला. अपूर्वाने पहिल्या एपिसोडपासूनच या शोमध्ये वादाची ठिणगी टाकली आहे. पहिल्याच दिवशी अपूर्वा आणि प्रसाद जवादे यांच्यात झालेल्या वादाची जोरदार चर्चा झाली होती. माझ्याकडे बोट दाखवून बोलायचं नाही अशी धमकीच अपूर्वाने प्रसादला दिली होती. त्यानंतरही अपूर्वा आणि किरण माने यांच्यातील वादाने बिग बॉसच्या घरात वादळ उठवलं आहे.
अपूर्वा आणि अक्षय हे विरोधी टीममध्ये असल्यामुळे त्यांच्यातही नेहमीच खटके उडत असतात. अपूर्वाच्या रागाचा पारा का चढलाय आणि त्यावर अक्षय, मला काहीच फरक पडत नाही. असं म्हणत तिला का उडवून लावतोय हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. बिग बॉस मराठी शो सुरू होऊन सहा आठवडे होत आले आहेत. आता या शोमध्ये चांगलीच रंगत पहायला मिळत आहे. पहिल्या सहा आठवड्यात पाच स्पर्धकांना बिग बॉस घराच्या बाहेरच रस्ता धरावा लागला आहे. यामध्ये निखिल, योगेश, त्रिशूल, मेघा, रूचिरा यांचा समावेश आहे. बिग बॉस सुरू झाल्यापासून अपूर्वा आणि अक्षय यांनी अनेक टास्कमध्ये आपल्या टीमचं पारडं जड ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. अक्षय तीनवेळा कॅप्टन तर अपूर्वा एकदा कॅप्टनही झाली आहे.
अक्षय अपूर्वाला असं म्ह्णताना दिसत आहे की, मी नाटकही पाहिले आहे आणि नाटकंही बघितली आहेत. त्यावर अपूर्वा तावातावाने अक्षयच्या दिशेने हातवारे करताना प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. अपूर्वा अक्षयला असं म्हणतेय की, उभं राहण्याचेही वांदे होतील अशी अवस्था केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माझ्यातला शाकाल जागा केलाय ना, आता बघाच अपूर्वा नेमळेकर नाव नाही लावणार, टॉयलेट बाहेर रांगा लागल्या पाहिजेत. प्रेमाची, बुध्दीची, पोटाची माती केलीय तुम्ही. आता तर थेट अपूर्वाने तिच्यातील शाकाल जागा करणाऱ्यांना धडा शिकवेन म्हणत आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन अक्षय केळकर कसा उडवून लावतो. अपूर्वाच्या म्हणण्याप्रमाणे ती शाकाल बनून अक्षयला धडा शिकवते का हे पाहण्यासाठी बिग बॉस शोचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत .