विठू माऊली या मालिकेने अजिंक्य राऊतला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. काही मोजक्या चित्रपटानंतर मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घेताना दिसला होता. या मालिकेनंतर अजिंक्य पुन्हा एकदा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. अजिंक्य लवकरच सोनी मराठीवरील अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेतून नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. आपली प्रेयसी बॉडीगार्ड बनून आपल्याचसोबत फिरत आहे हे गुपित नायकाला उलगडलेले नसते. त्यामुळे ही अनोखी प्रेमकहाणी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहत आहे.
त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणारी ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण हे जाणून घेऊयात. येत्या १७ जुलै पासून सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७.३० वाजता अबोल प्रीतीची अजब कहाणी ही नवी मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत अजिंक्य राऊत सोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री आहे जान्हवी तांबट. काळी माती हा तिचा पहिला वहिला चित्रपट नॅशनल अवॉर्ड विनर ठरला होता. या चित्रपटानंतर तिने दोन मालिकांमधून काम केलेले आहे. पण आता प्रथमच तिला मालिकेतून प्रमुख नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. या नव्या मालिकेत ती मयुरीच्या भूमिकेत दिसणार आहे. जान्हवीने सौंदर्य स्पर्धेतही सहभाग दर्शवला होता. २०२२ सालच्या मिस महाराष्ट्र या स्पर्धेत तिने फर्स्ट रनरअपचा मान पटकावला होता.
जान्हवी तांबट ही मूळची चिपळूणची. चिपळूण येथील नाटक कंपनीशी ती जोडली गेली. यातून महत्वपूर्ण भूमिका साकारत असताना तिला चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. झी मराठीवरील घेतला वसा टाकू नको, संत गजानन शेगावीचे अशा मालिकांमधून जान्हवी महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. मयुरीच्या भूमिकेसाठी जान्हवीला थोडीशी मेहनत घ्यावी लागत आहे. त्यामुळे ती या आगळ्यावेगळ्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहेत ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास अजिंक्य राऊत आणि जान्हवी तांबट यांना नवीन मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा.