आपण जी भूमिका जगलो त्याच व्यक्तिरेखेच्या सहवासात आपलं एक छानसं घर असावं, अशी ईच्छा ज्येष्ठ अभिनेते अजय पुरकर यांनी व्यक्त केली होती. अजय पुरकर हे गेल्या तीन दशकापासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. आजवर त्यांनी चित्रपट, मालिका तसेच नाटकातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मात्र पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटाने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. या चित्रपटात त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेचा प्रभाव म्हणून विशाळगडाच्या पायथ्याशी आपलं एक छोटं घर असावं अशी त्यांची इच्छा होती. गेल्या वर्षी त्यांची ही इच्छा पूर्ण देखील झाली.
विशाळगडाच्या अगदी पायथ्याजवळच अजय पुरकर यांनी जागा घेतली होती. त्यात त्यांनी एक टुमदार घर बांधलं होतं. त्यांच्या घराचे खास फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावेळी अजय पुरकर यांचे घर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. आता या घराबाबत अजय पुरकर यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेलं हे घर आता येणाऱ्या पर्यकटकांसाठी त्यांनी खुलं केलं आहे. विशाळगड आणि आसपासच्या परिसरात अनेक पर्यटक भेट द्यायला येत असतात. पर्यकटकांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी हे घर भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. घरातील सोयी सुविधांचा आणि घराच्या रचनेचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांच्या या कल्पनेचे अनेकांनी स्वागत केले आहे.
तर अनेकांनी विशाळगडावर छोटीशी ट्रिप आयोजित करण्याचे आश्वासन सुद्धा दिलं आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे घर असल्यामुळे पर्यटकांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटात अजय पुरकर यांनी वीर बाजीप्रभूंची भूमिका गाजवली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. अजय पुरकर प्रत्यक्षात ही भूमिका जगले होते. वीर बाजीप्रभूंच्या भूमिकेसाठी त्यांनी अतिशय मेहनत देखील घेतली होती. त्यामुळे या व्यक्तिरेखेचा सहवास लाभावा म्हणून त्यांनी विशाळगडच्या पायथ्याशी आपल्या स्वप्नातलं टुमदार घर बांधण्याची ईच्छा व्यक्त केली होती. त्यांची आई बाबांचं घर ही इच्छा आता पूर्णत्वास आलेली पाहायला मिळत आहे.