मराठी सृष्टीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून अविनाश आणि ऐश्वर्या नारकर ह्यांच्याकडे पाहिले जाते. ऐश्वर्या नारकर यांचे लग्नाअगोदरचे नाव पल्लवी. दोघांची पहिली भेट एका नाटकानिमित्त झाली होती. त्यानंतर ऐश्वर्या नारकर यांनीच पुढाकार घेऊन अविनाश नारकर यांना प्रपोज केले होते. एकत्र कुटुंब पद्धतीत त्यांचा संसार सुखाचा चालला आहे. या प्रवासात दोघेही आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. त्याचमुळे तरुण कलाकार त्यांचा हा आदर्श घेताना दिसत आहेत. अर्थात या वयात दोघांच्या कामाचा उत्साह भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे.
अविनाश नारकर यांचे रील व्हिडीओ प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यांच्या नृत्याच्या विशिष्ट शैलीमुळे ते मोठी प्रसिद्धी देखील मिळवत आहेत. काही लोकं आपल्या उत्साही डान्सला नावं ठेवत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून आनंदी कसं राहता येईल याचा विचार ते नेहमी करत असतात. आणि म्हणूनच कामाबद्दलच्या त्यांच्या या निष्ठेवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जातो. आता अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगाही कला सृष्टीत दाखल झाला आहे. अमेय नारकर हा लहानपणापासूनच खूप ऍक्टिव्ह आर्टिस्ट आहे. त्याला नृत्याची देखील विशेष आवड आहे. रुईया कॉलेजमध्ये शिकत असताना अमेयने नाटकाची आवड जोपासली. कॉलेजमध्ये त्याने विविध नाट्यस्पर्धांमधून सहभाग दर्शवला आहे.
अशातच आता तो व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना दिसत आहे. आजकल प्रस्तुत खरा इन्स्पेक्टर मागावर या नाटकाचे तो दिग्दर्शन करत आहे. टॉम स्टॉपार्ड यांच्या द रिअल इन्स्पेक्टर हाऊंड या एकांकिकेवर आधारित हे नाटक असणार आहे. अमेय नारकर आणि चिन्मय देव यांनी याचे मराठीत भाषांतर केले आहे. ऋषीकेश कळसकर, निखिल पाटील, ईशा संजय, समृद्धी दंडगे, विशाल वांगेकर, संकेत जगदाळे, चिन्मय देव , संतोष नाईक यांनी या नाटकातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. रविवारी १७ सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिर पुणे येथे या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. या नाटकातून अमेय दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. दिसायला हँडसम असलेला अमेय भविष्यात मराठी सृष्टीतूनही पडद्यावर झळकावा अशी आशा आहे.