आज पासून झी मराठी वाहिनीवर मन उडू उडू झालं या मालिकेच्या जागी तू चाल पुढं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहिल्याच दिवशी मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. मालिकेत अश्विनी वाघमारे मयुरी आणि कुहू या तिच्या दोन मुली, नवरा श्रेयस वाघमारे, सासू सासरे, नणंद शिल्पी आणि नंदेचा मुलगा अशी प्रमुख पात्र या मालिकेत दाखवण्यात आली आहेत. नेहमीप्रमाणेच धनश्री काडगावकर हिने विरोधी अभिनयाने नणंदेची भूमिका चोख बजावली आहे. तर दीपा परब हीने अश्विनीचा साधेपणा आणि निरागसपणा सुंदर वठवला आहे.
मालिकेचा प्रोमो ज्यावेळी प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यावेळी ही मालिका आई कुठे काय करते या मालिकेसोबत तुलना केली जाऊ लागली. त्यामुळे झी मराठी वाहिनीवर कॉपी करण्याचा शिक्का लावण्यात आला. मात्र आपल्या कुटुंबाची साथ न मिळू शकलेली अश्विनी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली पाहायला मिळाल्याने या मालिकेचे कौतुक करण्यात आले. श्रेयस वाघमारे हे पात्र अभिनेता आदित्य वैद्य याने साकारले आहे. आदित्य वैद्य याने कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. चार दिवस सासूचे या गाजलेल्या मालिकेत आदित्यने महत्वाची भूमिका साकारली होती. छोट्या मोठ्या भूमिका साकारत आदित्य इथपर्यंत पोहोचला आहे.
झी वाहिनीच्या तू चाल पुढं या मालिकेतून तो अश्विनीच्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे. श्रेयस वाघमारे हा घरातील सर्वांची मतं विचारात घेतो मात्र आपल्या मुली वाया जाऊ नयेत म्हणून तो अश्विनीला जबाबदार धरतो. श्रेयसच्या विरोधी वागण्याचा अश्विनीला नेहमी त्रास होतो मात्र यातूनही ती सुखाची वाट शोधत पुढे चालत राहते. मालिकेत श्रेयसची भूमिका काहीशी विरोधी असल्याने आदित्य वैद्यला प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. अशा भूमिकेमुळे आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध देखील फेमस झाला आहे त्यामुळे आदित्यसाठी ही भूमिका आव्हानात्मक ठरणार आहे. झी मराठीच्या या नवीन मालिकेसाठी आणि दमदार भूमिकेसाठी आदित्यला शुभेच्छा!