महेश कोठारे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा आदीनाथ कोठारे अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रात दाखल झाला. पण एक स्टार कीड म्हणून तुम्हाला जरी या सृष्टीत ओळखलं जात असलं तरी इथे तुम्हाला स्ट्रगल करावाच लागतो. असे मत आदीनाथ कोठारेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले आहे. तुम्ही कोण आहात यापेक्षा तुमच्या अभिनयाची कस पाहिली जाते हेच वास्तव आहे, असे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होते. माझा छकुला या चित्रपटातून आदिनाथने बालकलाकार म्हणून मराठी सृष्टीत पाऊल टाकले. महेश कोठारे यांनी त्यांच्या जबरदस्त चित्रपटाने मराठी सृष्टीचा एक काळ सावरण्याचा प्रयत्न केला.
यात त्यांना यश अपयश दोन्ही गोष्टींना सामोरे जावे लागले होते. आदिनाथने पुढे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर अभिनेता म्हणून तो मराठी सृष्टीत पुन्हा दाखल झाला. मधल्या काळात त्याने वडिलांना चित्रपट दिग्दर्शनात सहाय्यक म्हणून काम केले. पण एक वेळ अशी आली जिथे आदीनाथला दिग्दर्शन क्षेत्राची ओढ लागली. आपला विचार त्याने वडिलांना सांगितला तेव्हा महेशजींनी त्याला पाठिंबा दर्शवला. दुष्काळ भागाची परिस्थिती दर्शवणारा पाणी हा चित्रपट बनवण्यासाठी आदिनाथचा कस पणाला लागला. कारण चित्रपट बनवायचा जरी असला तरी निर्माता मिळणे आवश्यक होते. २०१६ साली पाणी या चित्रपट बनवण्यासाठी तो तयार झाला. पण इथे तुमचं आडनाव कामी येत नाही. कोठारे हे आडनाव असलं की लोक तुम्हाला फक्त या नावाने ओळख दाखवतात, हाय हॅलो करतात.
पण स्पॉन्सर म्हणून बाजूला होतात. इथे तुमचं काम महत्वाचं मानलं जातं. आदीनाथ याबाबत सांगतो की २०१६ मध्ये पाणी चित्रपटाचे स्क्रिप्ट तयार होते. त्यावेळी कोणीच चित्रपट बनवण्यासाठी पुढाकार घेत नव्हते. पाणी चित्रपटात दुष्काळाचे भीषण वास्तव दाखवायचे होते. हे शूटिंग मे महिन्यात व्हावं अशी माझी इच्छा होती. प्रियांका चोप्रा त्याकाळात मराठी चित्रपटाच्या शोधात होती. त्यांच्या टीमने माझ्याशी संपर्क साधला मात्र त्यांच्याकडून होकार येत नव्हता. २०१७ गेलं, २०१८ आलं त्यानंतर माझी तळमळ वडिलांनी पाहिली. काहीही करून आपण पैसे जमवू आणि मे महिन्यात शूटिंग करू असा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचदरम्यान प्रियांका चोप्राकडून होकार आला. त्यानंतर चित्रपट तयार झाला, त्याचे कौतुकही झाले. त्यानंतर या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.