झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले चिमुरडे गायक आपल्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या शोमध्ये जयेश खरे सह गौरी शेलार, देवांश भाटे, आदित्य फडतरे, सौरोजय देव यांच्या गायकीचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळते. गाण्याचे कुठलेही क्लासेस न लावलेले जयेश आणि गौरीने त्यांच्या गाण्यांनी परिक्षकांकडून वाहवा मिळवली आहे. मृण्मयी देशपांडेने नेहमीप्रमाणे तिच्या सूत्रसंचालनाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलेले पाहायला मिळते.

सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी आणि वैशाली माडे या परीक्षकांनी स्पर्धकांना वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने शोची रंगत आणखी वाढली आहे. अशातच आता अभिनयाचे सम्राट अशोक सराफ यांना शोमध्ये निमंत्रित करण्यात आले आहे. अशोक सराफ यांनी यावेळी अनेक मजेशीर गमतीजमती मंचावर शेअर केलेल्या पाहायला मिळाल्या. मृण्मयीने अशोक सराफ यांना काही मजेशीर प्रश्न विचारून वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अशोक सराफ यांनीही नेहमीप्रमाणे प्रश्नांची योग्य शब्दात मजेशीर उत्तरे दिली. अशोक सराफ यांनी वर्षा उसगावकर, रिमा लागू आणि अश्विनी भावे यांच्यासोबत काम केले आहे. या तिन्ही नायिकांबद्दल अशोक सराफ यांना प्रश्न विचारण्यात आले.

तीनही नायिकांचे फोटो असलेले बोर्ड अशोक सराफ यांच्याकडे देण्यात आले. आणि यातली कुठली नटी तयार व्हायला सर्वात जास्त वेळ लावते? असा प्रश्न मृण्मयीने अशोक मामांना विचारला. त्यावर अशोक सराफ यांनी अश्विनी भावे, रिमा लागू, वर्षा उसगावकर या तिघींचे बोर्ड वर केले. आणि या तिघीही तयार व्हायला वेळ लावतात हे त्यातून सुचवले. पुढे अशोक मामा त्रासलेला चेहरा दाखवून वेळ न लावणारी नटी अजून जन्माला यायचीये अशी मजेशीर प्रतिक्रिया देतात. बाईपण भारी देवा चित्रपटावेळी अशोक सराफ यांनी त्यांची एक खंत बोलून दाखवली होती. चित्रपटातून बाईचं भारीपण नेहमीच दाखवलं पण पुरुषांचं भारीपण दाखवायला कोणीच पुढाकार घेत नाही असे ते म्हणाले होते.