आज २२ मे अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर हिचा वाढदिवस आहे. दूरदर्शनवरील दामिनी मालिकेतल्या प्रमुख नायिकेच्या भूमिकेने प्रतीक्षा लोणकर यांना अमाप प्रसिद्धी मिळाली होती. प्रतिक्षाचे वडील डॉक्टर तर आई शिक्षिका त्यामुळे एका सुसंकृत घरात तिचा जन्म झाला. औरंगाबाद येथे तिचे संपूर्ण शिक्षण झाले. अभिनयाची गोडी अगोदरपासूनच होती त्यामुळे नाट्य विषयाची पदवी प्राप्त करून मुंबई गाठली. अभिनय क्षेत्राच्या पदार्पणातच “लग्न” हे पहिले व्यावसायिक नाटक तिने साकारले. सरकारनामा, पैंज लग्नाची, बिनधास्त, दामिनी, बंदिनी, एवढेसे आभाळ, ही पोरगी कोणाची, कळत नकळत, दौलत अशा चित्रपट मालिकेतून त्यांनी आपल्या सजग अभिनयाची चुणूक दाखवून दिली. मराठी चित्रपट आणि मालिकेप्रमाणे हिंदी सृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मिस्टर योगी, मिसेस माधुरी दीक्षित, इक्बाल, डोर,नन्हे जैसलमेर अशा चित्रपट आणि मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका बजावल्या. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत राजमाता जिजाऊंची भूमिका चोख बजावलेली पाहायला मिळाली. भेट या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक तिनं पटकावली आहेत. सोनी मराठीवरील ‘जिगरबाज’ या मालिकेत तिने साकारलेली धूर्त, कावेबाज, निगरगट्ट साहेबरावांची पत्नी आजवरच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी दिसली.
प्रतीक्षा स्क्रीनप्ले रायटर प्रशांत दळवी यांच्याशी विवाहबद्ध झाली. ‘रुंजी’ हे त्यांच्या एकुलत्या एक लेकीचं नाव. दामिनीची नायिका असो वा जिजाऊंसारखे दमदार पात्र प्रतीक्षा नेहमीच तिच्या अभिनयातून या सर्व भूमिकांना न्याय देताना दिसली. तिच्या सजग अभिनयाचे प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केले आहे. अशाच आणखी दमदार भूमिका यापुढे ती साकारत राहो हीच सदिच्छा आणि आजच्या वाढदिवसादिनी तिला कलाकार.इन्फो टीम तर्फे हार्दिक शुभेच्छा…