सोनी मराठी वाहिनीवर ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेतून मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली आहे त्यामुळे अल्पावधीतच या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. शिवाय सुहासिनी थत्ते, राजन ताम्हाणे, उमा सरदेशमुख, समिधा गुरू या कसलेल्या कलाकारांचीही साथ त्यांना लाभली आहे. अभिनेत्री “पल्लवी वैद्य” हिने या मालिकेतून मिराच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. पल्लवीने या मालिके अगोदर अनेक मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. आज अभिनेत्री पल्लवी वैद्य हिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
अभिनेत्री पल्लवी वैद्य ही मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री आहे. ‘अगंबाई अरेच्चा!’ या मराठी चित्रपटातून पल्लवी वैद्य हिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. या चित्रपटातून ती संजय नार्वेकर यांच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेतून तिने पुतळा मातोश्रींची भूमिका साकारली होती. गर्भ, झाले मोकळे आकाश या चित्रपटातूनही ती प्रेक्षकांसमोर आली. चला हवा येऊ द्या च्या मंचावरून तिच्या विनोदी अभिनयाने काही काळ तिने प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले होते. अजूनही बरसात आहे या मालिकेचे दिग्दर्शक “केदार वैद्य” हे पल्लवी वैद्यचे पती आहेत. केदार वैद्य हे मराठी चित्रपट, मालिका दिग्दर्शक आहेत. माझ्या नवऱ्याची बायको, अजूनही बरसात आहे, माझे पती सौभाग्यवती, झिपऱ्या या मालिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. अगंबाई अरेच्चा या चित्रपटात त्यांनी सह दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती त्यावेळी पल्लवीशी त्यांची मैत्री झाली. याच मैत्रीचे पुढे प्रेमात आणि लग्नात रूपांतर झाले.
पल्लवी वैद्य ही पूर्वाश्रमीची पल्लवी भावे. मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “पूर्णिमा भावे तळवळकर” या पल्लवीची थोरली बहीण आहेत. पूर्णिमा तळवळकर यांनी होणार सून मी ह्या घरची मालिकेतील बेबी आत्याची भूमिका साकारली होती. ‘क्यूँ रिश्तों में कट्टी बट्टी’ या हिंदी मालिकेत पूर्णिमा भावे महत्वाची भूमिका साकारत आहेत तर स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतूनही त्या प्रेक्षकांसमोर येत आहेत. दिवंगत अभिनेत्री, दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांच्या पुतण्याशी त्यांनी लग्न केले आहे.