स्टार प्रवाहवरील बहुतेक सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या पाहायला मिळत आहेत त्यात आता आणखी एक मालिका नव्याने दाखल झाली आहे. रात्री १०.३० वाजता “अबोली” ही मालिका सोमवार ते शनिवार स्टार प्रवाह वाहिनीवर प्रक्षेपित होत असून या मालिकेत अबोलीच्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी झळकताना दिसत आहे. तर अभिनेता सचित पाटील तिच्या सहनायकाची भूमिका बजावत आहे. थोडीशी घाबरलेली आणि अडखळत बोलणारी अबोली नावातूनच सर्व काही सांगून जाते. त्यामुळे ही भूमिका प्रेक्षकांना नक्किच भावणार यात शंका नाही.
गौरी कुलकर्णी या अभिनेत्रीने खूप कमी वयातच मालिका आणि चित्रपट सृष्टीत यश मिळवलं आहे तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातली. बारावीपर्यंतचे शिक्षण तीने तिथेच पूर्ण केले होते. पदवीचे शिक्षण घेत असताना कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण तिने घेतले, त्यामुळे कॉलेजमध्ये तिने अनेक स्पर्धांमधून पारितोषिके पटकावली होती. २००७ साली निरोप या चित्रपटात ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. समीर धर्माधिकारी आणि देविका दफतरदार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यानंतर गौरीने रियासत हा हिंदी चित्रपट साकारला हा हिंदी चित्रपट गाजवल्यानंतर, गौरीने आणखी तीन हिंदी चित्रपटातून काम केलं आहे. तसेच २०१७ साली रांजण ह्या मराठी चित्रपटात मधुची मुख्य भूमिका तिने साकारली होती. एकाच शाळेत शिकत असलेल्या मधू आणि प्रतापची अनोखी प्रेमकहाणी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. गौरी कुलकर्णी सोबत यश कुलकर्णी, पुष्कर लोणारकर, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, विद्याधर जोशी हे कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसले होते.
रांजण हा गौरीचा मुख्य नायिका असलेला पहिला मराठी चित्रपट ठरला होता, तर ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या झी युवा वरील मालिकेत तिने मध्यवर्ती भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. मालिका चित्रपट सृष्टीतून यश मिळवत असताना वयाच्या अवघ्या २१शीत असताना तिने हुंदाई क्रेटा गाडी घेऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. या मालिकेनंतर गौरी पुन्हा आता अबोली मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेसाठी गौरी कुलकर्णी हिला कलाकारांच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा…