मास्टर विनायक हे नाव चित्रपट सृष्टीला काही नवीन नाही. मास्टर विनायक म्हणजेच विनायक दामोदर कर्नाटकी यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून गाजवला होता. प्रभात कंपनीत त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केले. कोल्हापूरच्या सिनेटोन मधून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकले. यानंतर त्यांनी प्रफुल्ल पिक्चर्स ही कंपनी सुरू केली. यातूनच लता मंगेशकर यांना त्यांनी अभिनयाची संधी देऊ केली. पुढे लता मंगेशकर यांनी अभिनयातून काढता पाय घेतला. तेव्हा मंदिर चित्रपटात त्यांनी आपल्याच मुलीला बालकलाकार म्हणून काम दिले. बेबी नंदा ही मास्टर विनायकांची मुलगी.
मंदिर चित्रपटात नंदाने मुलाची भूमिका साकारली होती. भूमिकेसाठी नंदाला केस कापावे लागणार होते त्याला तिचा विरोध होता. आपल्याला चित्रपटात काम करायचंच नाही हे तिने ठरवलं होतं. दुर्दैवाने मास्टर विनायकांचे चित्रपटावेळीच निधन झाले. पुढे दिनकर पाटील यांनी हा चित्रपट पूर्ण केला. वडिलांच्या निधनामुळे चित्रपटात काम करण्याशिवाय बेबी नंदाकडे कुठलाच पर्याय नव्हता. काही चित्रपटासाठी बालकलाकार म्हणून काम करत राहिल्या. मास्टर विनायक यांचे मावसभाऊ व्ही शांताराम यांनी १९५६ साली तुफान और दिया चित्रपटातून नंदाला नायिकेची संधी देऊ केली. जब जब फुल खिले, गुमनाम, तीन देवियां, हम दोनों, इत्तेफाक अशा चित्रपटातून बेबी नंदा प्रमुख भूमिकेत झळकल्या.
बालकलाकार म्हणून मिळालेले बेबी नंदा हेच नाव त्यांचे नायिका म्हणूनही प्रसिद्ध झाले. मराठी चित्रपटातून नंदा यांनी नायिकेच्या भूमिका साकारल्या होत्या. देवघर, झालं गेलं विसरून जा, देव जागा आहे हे त्यांनी नायिका म्हणून मराठी चित्रपट केले होते. ६० ते ७० च्या दशकात नंदा यांनी अभिनेत्री म्हणून हिंदी सृष्टीत चांगले नाव मिळवले होते. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या नायिकांमध्ये त्यांचे नाव गणले जात होते. मधल्या काळात मात्र त्यांना नायकाच्या बहिणीच्या भूमिका जास्त मिळू लागल्या होत्या. जब जब फुल खिले या चित्रपटावेळी त्यांना सैन्यातील एका मराठी कर्नलने लग्नाची मागणी घातली होती. पण हे प्रकरण पुढे गेलेच नाही. पूढे चित्रपट निर्देशक मनमोहन देसाई यांच्याशी सूर जुळून आले.
दरम्यान मनमोहन देसाई यांनी जीवनप्रभा यांच्याशी लग्न केले. जीवनप्रभा यांच्या निधनानंतर मनमोहन देसाई आणि नंदा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र मनमोहन देसाई यांचे घराच्या बाल्कनीतून पडून अपघाती निधन झाले. यामुळे नंदा खूपच खचून गेल्या. मनमोहन देसाई यांच्या पश्चात त्या पांढरे कपडे घालू लागल्या. लग्न न करताच मनमोहन देसाई यांच्या विधवा म्हणून वावरू लागल्या. २५ मार्च २०१४ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी नंदा यांचे हृदयविकाराने निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन आहे यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.