रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेवंताची भूमिका गाजवली होती. शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने आपले वजन वाढवले होते. मात्र वाढलेल्या वजनावरून अपूर्वाची खिल्ली उडवली जात होती. रात्रीस खेळ चालेच्या दुसऱ्या पर्वाच्या यशानंतर रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र या तिसऱ्या पर्वात अपूर्वाला तिच्या भूमिकेला पुरेसा वाव मिळाला नाही. एवढ्या लांबून प्रवास करत तासनतास सेटवर बसून राहणे, सेटवर आपल्या सीनसाठी वाट पाहणे, नवख्या कलाकारांकडून हीन दर्जाची वागणूक मिळणे. आणि वेळेवर कामाचा मोबदला न मिळणे या कारणास्तव अपूर्वाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

अर्थात तिने साकारलेली शेवंता प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. शेवंताच्या भूमिकेमुळे ओळख मिळालेल्या अपूर्वाला देखील मालिका सोडणे तितकेच कठीण होते. परंतु मी लवकरच एका नव्या भूमिकेतून तुमच्या भेटीला येईल असा विश्वास तिने आपल्या चाहत्यांना दिला होता. याच विश्वासावर अपूर्वा आता आणखी एका दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून अपूर्वा राणी चेन्नमाची दमदार भूमिका साकारताना दिसत आहे. राणी चेन्नमा या भूमिकेसाठी जेव्हा अपूर्वाला विचारण्यात आले, त्यावेळी आपण हे पात्र निभावू शकतो की नाही यावर तिला शंका होती. कारण हे पात्र साकारण्यासाठी माझ्यावर खूप मोठी जबादारी येणार होती.
आपल्या चाहत्यांच्या अपेक्षेची पूर्तता करणे हे मोठे आव्हान होते असे ती या भूमिकेबाबत म्हणते. हे आव्हान स्वीकारायचा निश्चय करून अपूर्वाने या भूमिकेबाबत जाणून घेण्याची उत्सुकता दर्शवली. या ऐतिहासिक भूमिकेबाबत अपूर्वा म्हणते की, राणी चेन्नमा यांच्या इतिहासाचा अभ्यास मी केला. आपण ही भूमिका करू असा विश्वास निर्माण झाला. इतिहास जाणून घेतल्याने मला त्या पात्रात उतरणे सोपे झाले. कधी कधी अशा भूमिका साकारताना आपण चाहत्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रमाण बनतो. ते आपल्याला वास्तवात, त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेत पाहू लागतात. भाबड्या चाहत्यांना तो कलाकारच एक आदर्श बनतो, हीच या कलाकारीतेची आणि अभिनय या व्यवसायाची मोठी ताकद मी समजते.

त्यामुळे मला ही भूमिका साकारताना वैयक्तिक पातळीवर, खूप मोठी नैतिक जबाबदारी जाणवते. आशा करते मी आपल्या सर्वांच्या अपेक्षेला खरी उतरेल. आपल्या सर्वांचे आजवर असिमीत प्रेम आणि आशीर्वाद लाभत राहिला, तो यापुढेही असाच वृद्धिंगत होईल अशी आशा करते. अपूर्वाने स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतील राणी चेन्नमाच्या भूमिकेतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि ही भूमिका साकारताना कुठले आव्हान समोर होते याबाबत स्पष्टीकरण दिले. अपूर्वा ही भूमिका तितक्याच ताकदीने आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांसमोर उभी करणार यात शंका नाही. या नव्या भूमिकेसाठी अपूर्वा नेमळेकर हिला मनपूर्वक शुभेच्छा.