झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील आदिती विवाहसोहळा पार पडला आहे. आदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार आणि निल पाटील हे काल बुधवारी ६ जुलै २०२२ रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. साधारण चार दिवसांपूर्वी अमृताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून Bride To Be असे म्हणत लवकरच लग्न करत असल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर त्यांच्या मेहेंदीचा सोहळा आणि हळदीचा सोहळा मोठ्या थाटात सजलेला पाहायला मिळाला. याचवेळी अमृताने आपल्या लग्नाची तारीख देखील जाहीर केली होती. लग्नावेळी अमृताने पिवळ्या रंगाची पैठणी नेसली होती. या साडीत अमृताचे रूप अधिकच खुलून दिसत होती.
अमृताच्या लग्नाला बऱ्याचशा नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नानंतर लगेचच ग्रँड रिसेप्शन पार पडले. ३ एप्रिल २०२२ रोजी अमृता पवार आणि निल पाटील यांचा साखरपुडा पार पडला होता. ‘My person, for life’ असे म्हणत तिने या सोहळ्याचे खास फोटो इन्स्टग्राम अकाउंटवरून शेअर केले होते. अमृताने ज्याच्याशी साखरपुडा केला तो निल पाटील बायोमेडिकल इंजिनिअर आहे. अमृता पवार ही मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री आहे. तुझ्या माझ्या संसाराला या मालिकेत तिने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. मालिकेत आदिती आणि सिद्धार्थची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. या मालिकेत आदिती प्रेग्नंन्ट आहे मात्र ही गोष्ट सिध्दार्थला सांगावी की नाही या द्विधा मनस्थितीत ती आहे.
मालिकेचा हा ट्रॅक एका निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. यातच आता अमृताने मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. स्वराज्य जननी जिजामाता, ललित २०५, दुहेरी अशा मालिकांमधून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सिनिअर सिटीझन या चित्रपटातही ती झळकली आहे. लग्नासाठी मालिकेतून ब्रेक घेतल्याने अमृता काही काळ या मालिकेत दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मालिकेला वेगळे वळण निश्चितच लागलेले पाहायला मिळणार आहे. अमृता आणि निल पाटील यांच्या लग्नाचे काही खास व्हिडीओ तिने इन्स्टग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी त्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो. आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी नवविवाहित दाम्पत्य अभिनेत्री अमृता पवार आणि निल पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन.