गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओतून त्यांनी मराठी मालिकेतील कलाकारांवर मानसिक त्रास देण्याचे आरोप केले होते. या व्हिडिओत त्यांनी त्या कलाकारांची नावे देखील जाहीर केली होती. अभिनेत्री नंदिता धुरी पाटकर, किशोरी अंबिये आणि सुनील बर्वे तसेच दिग्दर्शक आणि अन्य काही कलाकारांची नावे घेत त्यांनी त्यांच्यावर मानसिक त्रास दिल्याचे आरोप लावले होते. अन्नपूर्णा ह्यांना कसा त्रास देण्यात आला हे व्हिडिओद्वारे त्यांनी सविस्तर सांगितले असल्याने त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांना सहानुभूती दर्शवत पाठिंबा दिला होता.
मालिकेत सुनील बर्वे यांनी अन्नपूर्णा यांच्या मुलाची भूमिका निभावली होती. मात्र मालिकेच्या सेटवर सुनील बर्वे मला मानसिक त्रास देत होते असे अन्नपूर्णा यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले होते. अन्नपूर्णा यांनी आपल्यावर लावलेल्या आरोपांवर सुनील बर्वे यांनी नुकतीच एक प्रतिक्रिया दिली होती की, ‘मी या इंडस्ट्रीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. परंतु माझ्यासोबत असा प्रकार कधीच घडलेला नाही. आमच्याबद्दल खोटी माहिती सांगून त्या लोकांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मालिका सोडण्याचा निर्णय हा सर्वस्वी त्यांचा होता. जेव्हा त्यांनी ही मालिका सोडली तेव्हा आम्हालाही खूप वाईट वाटले होते. परंतु मालिका सोडल्यानंतर त्यांनी हे सगळे आरोप का केले आहेत, असा व्हिडीओ शेअर करून त्यांनी आम्हाला दोषी का ठरवलं, हे आम्हाला माहीत नाही.” दरम्यान अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी सुनील बर्वे यांच्यासह मालिकेचे दिग्दर्शक तसेच अभिनेत्री नंदिता पाटकर आणि किशोरी अंबिये यांच्यावर देखील मानसिक त्रास देत असल्याचे आरोप लावले होते.
यावर आता प्रेक्षकांनी देखील नाराजी दर्शवत सुनील बर्वे यांना खडेबोल सूनावलेले पाहायला मिळत आहेत. सुनील बर्वे यांच्या मन सुध्द तुझं या मालिकेच्या पोस्टवर चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. ‘सुनील बर्वे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, एका सिनिअर ऍक्टरेसला टॉर्चर करता त्या कितीतरी चांगली ऍक्टिंग करायच्या’.. ‘सुनील बर्वे तुम्ही मला चांगले वाटायचे पण तुम्ही, किशोरी अंबिये आणि नंदिता यांनी अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या बरोबर चांगले नाही वागलात…’ या आणि अशा अनेक विरोधी टीका सुनील बर्वे यांच्यावर प्रेक्षकांनी केल्या आहेत.