सध्या सर्वत्र लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. भारतात आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग), तामिळनाडू प्रीमियर लीग या रोमांचक क्रिकेट लीग स्पर्धा प्रसिद्ध आहेत. तसेच परदेशात बिग बॅश लीग आणि सुपर लीग स्पर्धेचा थरार पाहायला मिळतो. याबाबतीत आपले मराठमोळे कलाकार देखील मागे नाहीत. नुकताच पुनीत बालन ग्रुप तर्फे मराठी सृष्टीतील कलाकारांसाठी ‘पुनित बालन सेलिब्रिटी क्रिकेट लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात बिग बॉस मराठी सिझन तीन मधील जय दुधाने आणि आदिश वैद्य विशेष आकर्षण ठरले.
पीबीसीएल २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना पन्हाळा पँथर्स आणि शिवनेरी लायन्स या दोन्ही संघांमध्ये लिजंड्स क्रिकेट मैदान मुंढवा येथे पार पडला. पन्हाळा पँथर्स टीमचे कप्तान शिखर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फायनल सामना हमखास चुरशीचा ठरणार होता यात शंका नव्हती. १० षटकांच्या या रोमहर्षक सामन्यात पन्हाळा पँथर्स संघाला प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ७६ धावा करण्यात यश आले होते. ज्यामध्ये शिखर ठाकूरने सर्वाधिक १४ धावांची खेळी केली. तर आदिश वैद्यने ११ आणि कुणाल फडकेने १० धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना शिवनेरी लायन्स संघाकडून सोहम बांदेकरने नाबाद २० धावांची खेळी केली. तर दीपक नायुडूने १८ धावांची खेळी केली.
शिवनेरी लायन्स संघाने हे आव्हान ६ गडी राखून आपल्या नावावर केले आणि या स्पर्धेचे पहिले वहिले जेतेपद आपल्या नावावर केले. विजयी संघाचे कर्णधारपद सुबोध भावेच्या हाती होते. तर अमेय वाघचा देखील या संघात समावेश होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवनेरी लायन्स संघाने जोरदार कामगिरी करून विजय मिळवला. आणि पीबीसीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामात जेतेपद मिळवले आहे. महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, प्रवीण तरडे, शरद केळकर, सिद्धार्थ जाधव हे विविध संघांचे कप्तान होते. तसेच या स्पर्धेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक, सुपरस्टार आणि दिग्गज कलाकारांनी चांगली चुरस दाखवत खेळाचा आनंद लुटला.